महापालिकेच्या ‘एन’ वॉर्डमध्ये कोट्यवधींचा टँकर घोटाळा?

By Admin | Published: August 7, 2016 03:20 AM2016-08-07T03:20:35+5:302016-08-07T03:20:35+5:30

सामान्य जनतेसाठी पालिकेकडून स्वस्त दरात पाणी विकत घेत हेच पाणी मोठ्या सोसायटी आणि विकासकांना विकून काही पालिका अधिकारी आणि नगरसेवकांनी ‘एन’ वॉर्डमध्ये

Millions of tanker scam in 'N' ward of municipal corporation? | महापालिकेच्या ‘एन’ वॉर्डमध्ये कोट्यवधींचा टँकर घोटाळा?

महापालिकेच्या ‘एन’ वॉर्डमध्ये कोट्यवधींचा टँकर घोटाळा?

googlenewsNext

- समीर कर्णुक, मुंबई

सामान्य जनतेसाठी पालिकेकडून स्वस्त दरात पाणी विकत घेत हेच पाणी मोठ्या सोसायटी आणि विकासकांना विकून काही पालिका अधिकारी आणि नगरसेवकांनी ‘एन’ वॉर्डमध्ये कोट्यवधींचा टँकर घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या नगरसेवकांनी बोगस सोसायट्या आणि काही मंडळे स्थापन करून हा पैसा लाटला असून, यामध्ये स्थानिक नगरसेवकांसह आमदार आणि पालिकेमधील मोठ्या अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्याने ‘लोकमत’ला सांगितले.
गेल्या वर्षी राज्यात कमी पाऊस झाल्याने मुंबई महापालिकेने शहरात पंधरा टक्के पाणीकपात केली होती. त्यामुळे अनेक सोसायट्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. घाटकोपरच्या ‘एन’ वॉर्डातील अनेक भागात पाण्याची मोठी टंचाई असल्याने येथील काही सोसायट्यांनी ही बाब स्थानिक नगरसेवकांच्या कानावर घातली. त्यानुसार स्थानिक नगरसेवकाने या रहिवाशांना पालिकेच्या जल विभागाकडे पत्र देण्यास सांगितले. रहिवाशांनी नगरसेवकाच्या सांगण्यावरून जल विभागाला पत्रदेखील लिहिले. या पत्रात दिवसभरात दोन ते तीन टँकर मिळावे, असे नमूद करण्यात आले होते. मात्र या सोसायटींच्या पत्रांवर खाडाखोड करून दोनऐवजी १२ ते १५ टँकर दिवसाला मागवण्यात आले आहेत. अशा रीतीने संपूर्ण ‘एन’ वॉर्डात वर्षभरात १५ हजार टँकरचा घोटाळा झाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांनी माहिती अधिकारांतर्गत प्राप्त कागदपत्रातून समोर आले आहे.
काही ठिकाणी काही सोसायट्या अस्तित्वात नसतानाही त्या सोसायटी आणि मंडळांच्या नावावर अनेक टँकर मागवण्यात आले. त्यामुळे हे पाणी गेले कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालिकेकडून सोसायट्यांना १५० रुपयांमध्ये एक टँकर मिळतो. हाच टँकर बाहेर विकासक, हॉटेल अथवा बड्या सोसायट्यांना विकल्यास त्याचे दोन ते अडीच हजार रुपये मिळतात. त्यामुळे पालिका अधिकारी आणि नगरसेवकांनी पाणी माफियांना हाताशी धरत बनावट सोसायटी तयार करून पालिकेकडून स्वस्त दरात पाणी घेतले. हेच पाणी दुपटीने विकत यामध्ये कोट्यवधीचा घोटाळा केला.

महापालिकेतील मुख्य जलअभियंता यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काही एक प्रतिसाद दिला नाही.

सोसायटींच्या पत्रांवर खाडाखोड करून दोनऐवजी
१२ ते १५ टँकर दिवसाला मागवण्यात आले आहेत.

घाटकोपरमधील सिद्धार्थनगरमध्ये अशाच रीतीने २ ते ३ टँकरच्या जागी १२ ते १५ टँकर दाखवण्यात आले होते. ही बाब याच परिसरात राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र तिवारी यांच्या लक्षात येताच त्यांनी माहितीच्या अधिकारातून संपूर्ण ‘एन’ वॉर्डाची माहिती मागवली असता हा प्रकार उघड झाला.

आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पाणीपुरवठा हा जल विभागामार्फत केला जातो.
- सुधांशू द्रिवेदी,
साहाय्यक आयुक्त, एन विभाग

‘एन’ वॉर्डमध्येच एवढा मोठा घोटाळा होत असेल तर मुंबईत याचे प्रमाण किती असेल? याचा विचार न केलेलाच बरा. या प्रकरणात आमदार, नगरसेवक आणि पालिका अधिकारी या सर्वांचाच हात आहे.
- रवींद्र तिवारी

Web Title: Millions of tanker scam in 'N' ward of municipal corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.