तुतारीच्या गजरात पार पडली गिरणी कामगारांची ३८९४ सदनिकांची सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:14 AM2020-03-02T06:14:23+5:302020-03-02T06:14:32+5:30
हक्काचे घर मिळावे यासाठी गिरणी कामगार देत असलेल्या लढ्याला यश आलेले पाहायला मिळत आहे.
मुंबई : हक्काचे घर मिळावे यासाठी गिरणी कामगार देत असलेल्या लढ्याला यश आलेले पाहायला मिळत आहे. म्हाडामार्फत रविवारी चौथ्या टप्प्यात गिरण्यांच्या जागेवर बांधण्यात आलेल्या बॉम्बे डाइंग टेक्स्टाईल मिल, बॉम्बे डाइंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास या तीन गिरण्यांमधील कामगारांसाठी ३,८९४ सदनिकांची सोडत काढण्यात आली. वांद्रे पूर्व येथे म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तुतारीच्या गजरात ही सोडत काढण्यात आली. विजेत्या ठरलेल्या गिरणी कामगारांचा आनंद गगनात मावत नव्हता, तर ज्या कामगारांना सोडत लागली नाही त्यांचे डोळे पाणावले होते.
विजेत्यांना गिरण्यांच्या जागेवर बांधण्यात आलेल्या जागेवरील घरे मिळणार असून २२५ चौ. फुटांचे घर अवघ्या साडेनऊ लाखांत उपलब्ध होणार आहे.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात सकाळी अकरा वाजता पार पडणाऱ्या लॉटरीसाठी रविवारी पहाटेपासूनच गिरणी कामगारांनी येण्यास सुरुवात केली. ३ हजार ८९४ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ वाढवून आज करण्यात आला. या सोडतीसाठी गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. म्हाडाच्या प्रांगणाबाहेरही गिरणी कामगार सोडतीचा निकाल पाहण्यासाठी आले होते. म्हाडात सोडतीसाठी निर्माण होणारी गर्दी पाहता या ठिकाणी मोठा पोलीस फाटा आणि वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. सोडत सुरू होईपर्यंत गिरणी कामगारांच्या चेहºयावर तणाव दिसत होता. सोडत जाहीर होताच विजेत्यांनी एकच जल्लोष केला, तर ज्यांचे नाव सोडतीत आले नाही त्यांनी यादीत आपले नाव तपासण्यासाठी एकच गर्दी केली. रविवारचा दिवस असल्याने गिरणी कामगार, वारस मोठ्या संखेने सोडतीच्या ठिकाणी उपस्थित होते.
वडाळा येथील बॉम्बे डाइंग टेक्सटाईल मिल गृहप्रकल्पांतर्गत ७२० सदनिका बांधण्यात आल्या आहेत. बॉम्बे डाइंग स्प्रिंग मिल येथेही २६३० सदनिका आणि लोअर परेल येथील श्रीनिवास मिलच्या जागी ५४४ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या सदनिका मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पातील २२५ चौ. फुटांच्या वन बीएचके स्वरूपातील अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत. काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाइंग मिल गृह प्रकल्पाच्या आवारात १५ मजल्यांचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॉवर) उभारण्यात आले आहे. यासाठी एकूण १ लाख ७४ हजार ३६ अर्ज गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून प्राप्त झाले आहेत.
>चार टप्प्यांत पार पडली सोडत
यापूर्वी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सदनिका सोडतीच्या पहिल्या टप्प्यात ६ हजार ९२५ सदनिकांची संगणकीय सोडत २८ जून, २०१२ रोजी तर दुसºया टप्प्यात २,६३४ सदनिकांची सोडत ९ जून, २०१६ रोजी काढण्यात आली. तर तिसºया टप्प्यात एमएमआरडीएकडून भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील अशा २६३४ सदनिकांची सोडत २ डिसेंबर, २०१६ रोजी काढण्यात आली. अशा प्रकारे अद्याप मुंबई मंडळातर्फे एकूण ११ हजार ९७६ सदनिकांपैकी आठ हजार ४९० सदनिकांचा ताबा गिरणी कामगारांना देण्यात आला.
>मुंबई पालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. येत्या काळात जास्तीत जास्त परवडणारी घरे मुंबईत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोणीही घरापासून वंचित राहणार नाही. झोपडपट्टीवासीय, गिरणी कामगार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. पुढील काळात पोलीस, शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी दहा टक्के घरांचा समावेश असेल.
- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री
पिरामल मिलमध्ये वडील कामाला होते. त्यामुळे गिरणी कामगारांच्या संपाची धग जवळून अनुभवली आहे. गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची वाटचाल अत्यंत संघर्षमय असून महाराष्ट्र शासनाने मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी गिरणी कामगारांना घर देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.
- किशोरी पेडणेकर, मुंबईच्या महापौर
मुख्यमंत्र्यांनी गेल्या रविवारी बैठक घेऊन येत्या सात दिवसांत सोडत काढण्याचे निर्देश दिले. या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी आज होत आहे. गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी गिरणी कामगारांच्या नावांच्या यादीची छाननी करण्याबाबतची मागणी पूर्ण करीत त्यांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतरच आजची सोडत काढण्यात येत आहे.
- मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष, म्हाडा
सोडतीचे वेबकास्टिंगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण
या सोडतीचे वेबकास्टिंगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. http://mhada.ucast.inल्ल या संकेतस्थळाद्वारे म्हाडाने हे थेट प्रक्षेपण केले. हे थेट प्रक्षेपण भारतासह १४ देशांतील ५ हजार ७०७ नागरिकांनी बघितले. तर म्हाडाने जे विजेते ठरले आहेत त्यांची यादी https://mhada.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.