Join us

‘एमआयएम’चा महापालिकेत चंचूप्रवेश

By admin | Published: February 24, 2017 8:07 AM

‘एमआयएम’चा महापालिकेत चंचूप्रवेशमुस्लीम बांधवांना भावनिक आवाहन करीत आपले अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या

जमीर काझी   मुंबईमुस्लीम बांधवांना भावनिक आवाहन करीत आपले अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या ‘एमआयएम’ने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन सदस्यांच्या रूपाने चंचूप्रवेश केला असला तरी त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यांच्या उमेदवारांचा फटका काही प्रमाणात दोन्ही कॉँग्रेस व समाजवादी पार्टीला सोसावा लागला आहे. मात्र पक्षाचा मुंबईतील एकमेव आमदार असलेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून सर्व उमेदवार चौथ्या, पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यामुळे आमदार वारिस पठाण यांची मोठी नाच्चकी झाली आहे. मुस्लीम मतदारांनी एमआयएमला फारसे महत्त्व दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी एमआयएमने १७ प्रभागांत मतांची आघाडी घेतली होती. मात्र वांद्रेतील भारतनगर व अनुशक्तीनगर या दोन ठिकाणीच ती टिकविण्यात यश आले आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत मतांमुळे महापालिकेच्या रिंगणात तब्बल ५९ उमेदवार उभे केले होते. त्यातून किमान १० ते १२ जागा जिंकण्याचे ‘टार्गेट’ होते. त्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा ओवेसी बंधू मुंबईत ठिय्या ठोकून होते. त्यांनी तब्बल १३ सभा आणि तितक्याच रॅली घेतल्या होत्या. मात्र दोन विजयी उमेदवार वगळता अन्य बहुतांश ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे ओवेसी बंधूंचे कट्टरतावादी विचार मुस्लिमांनी फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार प्रामुख्याने सत्ताधारी शिवसेना व भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने गाजत राहिला. त्यामुळे गटबाजी पोखरलेली काँग्रेस निवडणुकीपूर्वीच पराभूताच्या मानसिकतेमध्ये होती. त्यामुळे एमआयएमच्या उमेदवारांमुळे त्यांच्यावर फारसा परिणाम झाला, असे म्हणणे अयोग्य होईल. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष निजामुद्दिन राईन यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली असली तरी तो पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. तर काँग्रेसचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला.