मसूद अजहर मौलाना नाही तर सैतान - असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 09:35 PM2019-02-23T21:35:20+5:302019-02-23T21:49:40+5:30
'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहर हा मौलाना नाही, तर सैतान आहे, अशा शब्दांत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यात पाकिस्तान सरकार, आयएसआय, दहशतवादी जबाबदार आहे. हा हल्ला घडवणारी 'जैश-ए-मोहम्मद' माझ्या दृष्टीने 'जैश-ए-सैतान' आहे. 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहर हा मौलाना नाही, तर सैतान आहे, अशा शब्दांत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.
मुंबईतील शिवाजी पार्कवर वंचित बहुनज विकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहर हा मौलाना नाही, तर सैतान आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टीव्हीवर बसून सल्ले देऊ नये. आधी उरी, पठानकोट आता पुलवामात हल्ला झाला. त्यामुळे तुमच्या शब्दांवर आमचा विश्वास नाही, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
पाकिस्तानी मंत्री म्हणतो युद्ध झाले तर मंदिरातील घंटा वाजणार नाही. तुम्ही भारताला ओळखले नाही. इथे जोवर मुस्लिम आहे, तोवर मशिदीतीत अजान, मंदिरातून घंटानाद, चर्च मधून प्रार्थनेचे सूर उमटत राहतील.ज्यावेळी देशाचा प्रश्न येतो त्यावेळी आम्ही एक असतो. त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांनी भारतातील मुस्लिमांची काळजी करण्याचे सोडून द्यावे. तुमच्याकडे खायला काही नाही. आम्हाला कशाला शिकवता. आम्ही जिनाचे निमंत्रण धुडकावून भारतात राहिलो आहोत, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
आम्ही पाकिस्तानच्या धमकीला भीक घालत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेले २०० किलो आरडीक्स आलेच कसे? 40 जवान शहीद झाले त्याला जबाबदार कोण? हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का? असा सवाल करत पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
७० वर्षात आमच्याशी न्याय झाला का? बाबासाहेबांनी जे संविधान दिले आणि राजकीय शक्ती बनण्याचे आवाहन केले. त्या संविधान विरोधात सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिले. कोणी त्याला विरोध केला नाही. त्या रामदास आठवलेंनी तोंड उघडले ते फक्त चमच्यागिरी आणि जोक करण्यासाठी. आता तर युती झाल्याबर स्वतःच रडतायत मला काही दिले नाही म्हणून. आठवले यांनी स्वतःला जोक बनवून घेतले, असे म्हणत रामदार आठवले यांच्यावर टीका केली.
दलितांना न्याय कोण देणार? नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी, शरद पवार की ठाकरे देणार आहेत. हे सारे पेशवे आहेत. त्यामुळे सगळ्यांनी प्रकाश आंबेडकरांचे हात मजबूत करा. त्यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळेल, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
भारताच्या राजकारणात क्रांती होत आहे. आता २८० चे सरकार नाही बनणार. मुस्लिमांच्या तबाही, बरबादीचे कारण काँग्रेस आहे. मुस्लिमांनी आता काँग्रेसचा साथ आणि नाद सोडून द्यावे. दहा वर्षात एक मुस्लिम खासदार नाही त्याला काँग्रेस जबाबदार. आता महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या मागे मुस्लिम समाजाने उभे राहावे, असे आवाहन सुद्धा असदुद्दीन ओवेसी यांनी केले.