Join us

वारिस पठाण यांच्या विधानावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 4:53 PM

 गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर  एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारे विधान केले होते.

मुंबई - एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या मुस्लिमांना चिथावणी देणाऱ्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपा, शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मात्र वारिस पठाण यांच्या वक्तव्याबाबत एमआयआमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्याकडे प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. ''वारिस पठाण यांनी जेव्हा हे वक्तव्य केले तेव्हा तिथे काही गैरमुस्लिमसुद्धा उपस्थित होते.त्यांनी केलेल्या विधानाचा शब्दश: अर्थ घेण्याची गरज नाही. सध्या गाजत असलेल्या सीएए, एनआरसीविरोधात मुस्लिम समाजातील संताप त्यांनी या विधानामधून व्यक्त केला आहे,'' असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.  गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर  एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारं विधान केलं आहे. आम्ही १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी पडू, असं वारिस पठाण यांनी म्हटले होते. भायखळ्याचे माजी आमदार असलेले वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केले. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. 

संबंधित बातम्या

VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

छातीवर गोळ्या झेलू पण कागदपत्रं दाखवणार नाही - असदुद्दीन ओवेसी

संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसीवारिस पठाण यांच्या विधानावर भाजपा, शिवसेनेनं टीकेची झोड उठवली. 'पठाण यांनी जनतेला आव्हान देऊ नये. त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत,' अशा शब्दांत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पठाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेनंदेखील पठाण यांच्या विधानाचा समाचार घेतला. पठाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कर्नाटकमध्ये त्यांनी हे विधान केलं. कर्नाटकात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी पठाण यांच्यावर कारवाई करावी, असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :इम्तियाज जलीलवारिस पठाणआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन