बोरिवलीत उभी राहतेय मिनी धारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:13+5:302021-06-18T04:06:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे दहिसर पश्चिम गणपत पाटील नगरमध्ये गेल्या दशकात मिनी धारावी वसली असताना, आता बोरिवलीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे दहिसर पश्चिम गणपत पाटील नगरमध्ये गेल्या दशकात मिनी धारावी वसली असताना, आता बोरिवलीच्या पश्चिमेला नाल्यात सरकारी जागेवर मिनी धारावी उभी राहत आहे. बोरिवली पश्चिम भीमनगर गल्ली क्रमांक ३ च्या पाठीमागे नाल्यामध्ये भराव टाकून सुमारे ६० ते ७० पक्क्या नवीन अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम सध्या येथे राजरोसपणे सुरू आहे.
बोरिवलीच्या भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा निवळे आणि नगरसेविका अंजली खेडकर यांच्याकडे या संदर्भात वारंवार तक्रारी येत होत्या. त्यांनी बुधवारी स्टिंग ऑपरेशन करून धाडसाने घटनास्थळी येत सदर बांधकाम रोखले. ही बाब त्यांनी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरिवली विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील राणे यांना सांगताच त्यांनी या जागेची पाहणी करण्याची सूचना केली तसेच पालिका अधिकाऱ्यांनासुद्धा कळविले.
याठिकाणी रेश्मा निवळे, नगरसेविका अंजली खेडकर गेल्यावर जवळजवळ ६० ते ७० पक्क्या झोपड्या तयार झाल्याचे व अजूनही नाल्यात भराव टाकत असल्याचे त्यांना दिसले. त्या दोघींनी विरोध करुन हे काम थांबवले तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी येथे बनत असलेल्या मिनी धारावीचा आखो देखा हाल पेश केला.
याप्रकरणी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, जर खासगी जागेवर २ फूट बांधकाम केले तर महापालिका ते तोडते आणि याचवेळी सरकारी जागेवर राजरोसपणे उभ्या राहणाऱ्या झोपड्यांकडे मात्र महापालिका दुर्लक्ष करते. यावरून नागरिकांनी काय ते समजून जावे, असा टोला लगावला.
याप्रकरणी आमदार सुनील राणे यांच्याशी संपर्क साधला असता, पूर्वी चार बांबू आणि त्यावर ताडपत्री टाकून उभारलेली झोपडी असे म्हटले जात होते. मात्र, याठिकाणी सरकारी जागेवर विटांचे पक्के बांधकाम करून झोपड्या उभ्या राहतात. याकडे पालिका प्रशासन, तलाठी व उपनगर जिल्ह्याधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. उद्या येथे दुर्घटना घडल्यास आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न त्यांनी केला.
याप्रकरणी झोपडपट्टी दादांवर एमआरटीपी लावून गुन्हा दाखल करावा व हे बांधकाम ताबडतोब निष्कासित करावे, असे आपण आर मध्य वॉर्डच्या वार्ड ऑफिसर डॉ. भाग्यश्री कापसे यांना कळवले आहे. पालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त मिळाल्यानेच ही पक्की बांधकामे येथे सुरू असून, गोराई चारकोप येथील पाणी या अनधिकृत झोपड्यांना पुरवले जाते. त्यामुळेच चारकोप गोराई म्हाडा सोसायट्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
------------ -- - -- - - -