Mini Lockdown : ती लोकंच जगली नाहीत, तर सरकार काय कामाचं? निर्बंधावर राऊतांचं 'कडक' मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 10:18 AM2021-04-07T10:18:18+5:302021-04-07T10:18:47+5:30
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्वच पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करुन लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोविडविरुद्धची लढाई लढायला हवी.
मुंबई - सरकारने अंशतः लॉकडाऊन जाहीर केले आणि प्रत्यक्षात ‘ब्रेक द चेन’ च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप करीत राज्यात ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांची दिशाभूल केली आहे. २५ दिवस दुकाने बंद ठेऊन कसे जगायचे असा संतप्त प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. हा ‘ब्रेक द चेन’ व्यावसायिकासाठी ‘ब्रेक द लाईफ’ ठरू शकतो, अशाही प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे सूचवले आहे. यासंदर्भात, खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्वच पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करुन लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोविडविरुद्धची लढाई लढायला हवी. राजकारण करण्यासाठी उभा जन्म आपल्याकडं आहे. सरकार येतं आणि सरकार जातंही, पण जे लोकं सरकार निवडून देतात, तीच जगली नाही, तर राज्य आणि सरकार काय कामाचं. सरकाराने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
गुजरात हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहे, तेथे उच्च न्यायालयाने लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरुन, जर लॉकडाऊन केलं नाही तर परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेचं हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले फडणवीस
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावी. तसेच, सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊन असल्याचे समजून आम्ही सहमती दर्शवली होती. मात्र, इतरही 5 दिवस लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीचे कडक निर्बंध असल्याने जनमानसात कमालीची अस्वस्था आहे. त्यामुळे या निर्बंधाची नव्याने अधिसूचना जारी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.
मराठवाडा : दुकाने बंद, पण नाराजी
औरंगाबाद : अंशतः लॉकडाऊन म्हटल्याने नेहमी प्रमाणे दुकाने उघडी राहतील, या विचाराने व्यापारी गाफील होते. पण जिल्हा प्रशासनाने रात्रीतून निर्णय बदलला होता. जालना जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळी दुकाने उघडली होती. परंतु, दुपारी पोलिसांनी शहरात फिरून सर्व दुकाने बंद केली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्ती केली.
पश्चिम महाराष्ट्र : सरकारला दोन दिवसांची मुदत
पुणे : आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत, दरम्यान मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करू, ऐकले तर ठीक, अन्यथा निर्णय घ्यावाच लागेल असा इशारा पुणे शहर व्यापारी महासंघाने दिला आहे. महापालिका एक सांगते, मग राज्य सरकार दुसराच आदेश काढते, अशा शब्दांत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका यांनी बंदच्या आदेशाविषयी संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवली. साताऱ्यात व्यापाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. सांगलीत सलून वगळता इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, झेरॉक्स सेंटर, बुक सेंटर, हॉटेल, मॉल वजा छोटे बझार दिवसभर सुरू होते.
विदर्भ : व्यापाऱ्यांत असंतोष
नागपूर : व्यापारी आणि दुकानदारांनी संभ्रावस्थेत लॉकडाऊन पाळला, मात्र या निर्णयाविरोधात सर्वत्र संताप दिसला. काही दुकानदारांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. बुलडाण्यात विविध संघटना व व्यापाऱ्यांमधून विरोध होत आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे बुलडाण्यात रास्ता रोको करण्यात आला.