मिनी लॉकडाऊन : मुंबईचा वेग कमी झाला; कठोर निर्बंधांना तुरळक ठिकाणी प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांकडे मुंबईकरांनी पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवारी दुर्लक्ष केले असतानाच, दुसऱ्या दिवशी मात्र यास काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. मुंबई शहर आणि उपनगरात बहुतांश ठिकाणी बुधवारी सकाळी यास सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र होते. बहुतांश बाजारपेठांमध्ये तुरळक गर्दी होती, शिवाय दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती किंवा काही दुकानांचे शटर अर्धे उघडे होते. असे असले तरी येथे येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर निर्बंध जारी केले. मात्र, त्यास राज्यातून आणि मुंबईतून विरोध होऊ लागला. सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून निर्बंध लागू झाले असले, तरी ते कुठेच पाळले गेले नाहीत. मंगळवारी सकाळी तर गोंधळात गोंधळ होता. मुंबईत सर्वत्र संचार सुरू असतानाच, राज्यात मात्र काही ठिकाणी निर्बंध पाळले जात होते. मंगळवारी सकाळी आणि दुपारी दुकाने सुरू होती. बाजारपेठा सुरू होत्या. सायंकाळीही हेच चित्र होते. रात्री मात्र शुकशुकाट होते. बुधवारी सकाळी मात्र चित्र काही प्रमाणात बदलले. मंगळवारी पोलिसांनी दिवसभर घातलेली गस्त आणि बंद करण्यास लावलेली दुकाने अशा घटनांमुळे बुधवारी सकाळपासूनच बाजारपेठांंमध्ये कमी गर्दी होती.
बुधवारी सकाळी बाजारपेठा भरल्या असल्या, तरी भाजीवाल्यांचे प्रमाण कमी होते. ग्राहकांचीही तुरळक गर्दी होती, शिवाय बहुतांश बाजारपेठांतील बहुतांश दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. काही दुकानदारांनी शटर अर्धे बंद केले होते. सराफांनी दुकाने उघडली असली, तरी ग्राहक येथे फिरकले नव्हते, शिवाय इतर दुकाने सुरू असली, तरी ग्राहकांचे पाऊल तिकडे फिरकले नाही. मुळात सोमवार रात्र आणि मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मुंबईकरांनी निर्बंधांस सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली होती.
दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, लालबाग मार्केट, दादर मार्केट, कुर्ला मार्केट, अंधेरी आणि वांद्रे मार्केट या सर्वच ठिकाणी बुधवारी सकाळी तुरळक गर्दी होती. बाजारपेठा सुरू असल्या, तरी दोन दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण कमी होते. बाजारपेठांतील बहुतांश दुकानदारांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, सोमवार आणि मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दुकानदारांनी दुकाने बंद केली आहेत. कारण त्यांना कारवाईची भीती आहे. मुळात लॉकडाऊनने कंबरडे मोडले आहेत. त्यात जर आता कारवाई झाली, तर अडचणी आणखी वाढतील. त्यामुळे बहुतांश दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली आहेत. काही दुकानदारांनी अर्धे शटर बंद केले आहे. मात्र, ग्राहक फिरकत नाही.
मुंबई सेंट्रल आणि कुर्ला येथे व्यवसाय, गाळे आणि दुकाने असलेल्या काही व्यापाऱ्यांना ‘लोकमत’ने विचारले असता, त्यांनीही कारवाईची भीती व्यक्त केली. अगोदरच खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे आणखी नुकसान नको असल्याने त्यांनी दुकाने बंद ठेवली. दुसरीकडे बुधवारी सकाळी मुंबईचे रस्ते फुलले असले, तरी तुलनेने गर्दीचे प्रमाण कमी होते. दुपारी तर अक्षरश: शुकशुकाट होता. नेहमी ज्या बाजारपेठा ओव्हर फ्लो होतात, त्या बाजारपेठा बुधवारी मात्र कमी गर्दीने वाहत होत्या.
मुंबईतल्या वाहतुकीचा विचार करता रस्त्यांवर वाहने असली, तरी तुलनेने हे प्रमाण कमी जाणवत होते, शिवाय नागरिकही विनाकारण घराबाहेर पडत नव्हते. रात्री ८ नंतर कारवाई होईल, या भीतीनेही अनेक जण रस्त्यांवर अथवा घोळका करून उभे राहत नव्हते. याबाबत अशाच अनेक लोकांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मुळात अशा निर्बंधामुळे गरिबांचे मोठे नुकसान होते आहे. असे नुकसान होऊ नये, म्हणून कार्यवाही करणे गरजेचे आहे. आता लोक सकारात्मक प्रतिसाद देत असले, तरी त्यांचे नुकसान मोठे होत असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर टीकाही केली जात आहे. त्यामुळे या सगळ्याचा गरिबांना फटका बसणार नाही, याची काळजी घ्यावी.