मुंबई : यंदाच्या महाराष्ट्र दिनापासून राज्यात 'महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा' रंगणार असून, या स्पर्धेला मिनी ऑलिम्पिक म्हणूनही ओळखण्यात येईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ऑलिम्पिकमध्ये जास्तीत-जास्त पदके मिळविण्याच्या उद्देशाने ऑलिम्पिक संघटनेने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन पवार यांनी केले. या बैठकीसाठी पवार यांनी मंत्रालयातील आपल्या दालनातून ऑनलाईन उपस्थिती दर्शविली होती. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, उपाध्यक्ष अशोक पंडित, उपाध्यक्ष जय कवळी, महासचिव नामदेव शिरगावकर आणि संघटनेचे इतर सदस्य व पदाधिकारी यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.
ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीसाठी सूचना देताना पवार यांनी सांगितले की, '२०२४, २०२८ आणि २०३२ च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी सर्वच संघटनांनी 'ऑलिम्पिक व्हिजन डॉक्युमेंट' राज्याच्या क्रीडा विभागाकडे लवकरात लवकर सादर करावे. कोरोना महामारीमुळे खेळाडूंचे मनोबल खचू नये, यासाठी क्रीडा संघटनांनी काम करावे. कोरोनाच्या संकटात सर्व खेळाडूंची काळजी घ्यावी.'
खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 'क्रीडा दिन'भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे दिग्गज मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यानुसार येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने खाशाबा जाधव यांच्या जयंतीला राज्यात ऑनलाईन क्रीडा दिन साजरा होईल.