Join us

सहा महिन्यांत रंगणार ‘मिनी विधानसभा’, महापालिका, जि.प. निवडणुकांची प्रतीक्षा संंपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 6:13 AM

निवडणुका रखडलेल्या या महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील राजकीय कार्यकर्त्यांना असलेली निवडणुकीची प्रतीक्षा या वर्षी संपणार आहे.  

- दीपक भातुसे    

मुंबई : राज्यातील दीर्घकाळ रखडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका नव्या  वर्षात पार पडणार असून या निवडणुका पहिल्या सहा महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात १५ महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांचा समावेश आहे. निवडणुका रखडलेल्या या महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील राजकीय कार्यकर्त्यांना असलेली निवडणुकीची प्रतीक्षा या वर्षी संपणार आहे.  

यातील पाच महापालिकांची मुदत २०२० सालीच संपली असून या निवडणुका तब्बल पावणे तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. तर मुंबईसह १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका मार्च २०२२ पासून रखडल्या आहेत. २०२० साली कोरोनामुळे पाच महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, तर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महापालिकांच्या प्रभाग संख्येत आणि जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुका पुढे गेल्या. 

शिंदे-फडणवीस सरकार  सत्तेवर आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेला प्रभाग वाढीचा निर्णय रद्द केला. महापालिकांमधील प्रभाग वाढ रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली असल्याने आता या निवडणुका सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते, यावर अवलंबून आहेत. येत्या वर्षात सर्वोच्च न्यायालयात याबाबत अंतिम निकाल लवकरच देण्याची शक्यता असून त्यानंतर या निवडणुका जूनच्या आत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

रखडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदा- २०२० मध्ये मुदत संपलेल्या महापालिका  नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, कोल्हापूर- फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपलेल्या १० महानगरपालिका  मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर - मार्च २०२२ मध्ये मुदत संपलेल्या २५ जिल्हा परिषदा  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

टॅग्स :नगर पालिकानिवडणूक