मिनी विंटर! मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीची चाहूल; १८.२ अंश तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 10:09 AM2021-01-21T10:09:55+5:302021-01-21T10:10:20+5:30
उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मिनी विंटर अनुभवास येत आहे. येथे किमान तापमानात घट झाली आहे.
मुंबई : मुंबईचे किमान तापमान गुरुवारी १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. परिणामी मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे. मध्यंतरी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाले होते. त्यामुळे मुंबई आणि राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली होती.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मिनी विंटर अनुभवास येत आहे. येथे किमान तापमानात घट झाली आहे. जळगाव, पुणे, नाशिक, महाबळेश्वर, डहाणू, गोंदिया या शहरांच्या किमान तापमानात चांगली घसरण झाली आहे. आठवडाभर किमान तापमान खाली घसरण्याचा ट्रेंड कायम राहील, अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे.
२० जानेवारी पासून राज्यात पुन्हा एकदा थंडीची मध्यम लाट येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार किमान तापमानात घट होत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव राहील. २२ आणि २३ जानेवारी नंतर पुणे, नाशिक येथील पारा १२ अंशा खाली जाईल. मुंबई आणि परिसरात देखील किमान तापमानात घट होईल. किमान तापमान १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढले होते. शिवाय किमान आणि कमाल तापमानात देखील वाढ झाली होती. सरासरी तापमान ४ अंशांनी वाढले होते. शिवाय आकाश मोकळे होते. परिणामी नागरिकांना उन्हाचे चटके बसत होते. आणि दिवसासह रात्री देखील किंचित उकाडा जाणवत होता. मात्र आता किमान तापमानात घट झाल्याने हे प्रमाण कमी होईल.