हृदयातील मिट्रल व्हॉल्व्हसाठी दोन रुग्णांवर मिनिमल शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:57+5:302021-07-29T04:07:57+5:30
मुंबई : किमान तीव्रता असलेली शस्त्रक्रिया ‘मिनिमल इन्व्हेसिव्ह’ हा हृदय शस्त्रक्रियेचा प्रकार देशात नवीन आहे. कोरोनरी हार्ट डिसीजच्या उपचारांसाठी ...
मुंबई : किमान तीव्रता असलेली शस्त्रक्रिया ‘मिनिमल इन्व्हेसिव्ह’ हा हृदय शस्त्रक्रियेचा प्रकार देशात नवीन आहे. कोरोनरी हार्ट डिसीजच्या उपचारांसाठी कोरोनरी बायपास करण्याचे हे तंत्र तुलनेने नवीन आणि अद्ययावत आहे. या तंत्रात ४-६ सें.मी.च्या लहान छेदामार्फत हृदयापर्यंत पोहोचले जाते. यात हाडांना न कापता, स्नायूला भेदून हाडाच्या सापळ्यामधून छातीत प्रवेश केला जातो. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात कार्डिओ थोरिॲक सर्जन डॉ. मंगेश कोहळे यांनी नुकतीच दोन रुग्णांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.
डॉक्टरांनी ६५ वर्षीय जयंती (नाव बदललेले) अणि ५६ वर्षांच्या गंगाराम (नाव बदललेले) या दोन रुग्णांवर किमान तीव्रता असलेली शस्त्रक्रिया केली. जयंती यांना श्वासासंबंधी तक्रार होती. टूडीइको केल्यानंतर मिट्रल व्हाॅल्व्ह आजार निदर्शनास आला आणि रिप्लेसमेंट उपचाराचा सल्ला देण्यात आला. डॉ. कोहळे आणि त्यांच्या चमूने छातीच्या उजव्या बाजूला खाली ६ सें.मी. लहान छेदासह मिट्रल व्हाॅल्व्हची शस्त्रक्रिया केली. ५६ वर्षांच्या गंगाराम यांना गेल्या दोन महिन्यांपासून छातीत तीव्र वेदना होत होत्या आणि मुख्य धमनीमध्ये ९० टक्के गंभीर ब्लॉकेज होते. त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूला ६ सें.मी.चा छेद करून कमी तीव्र (मिनिमल इन्व्हेसिव्ह) बायपास शस्त्रक्रिया केली.
दोन्ही प्रकरणांत डॉ. कोहळे यांनी केलेली शस्त्रक्रिया मुंबईमध्ये नवीन आहे. मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया प्रत्येक रुग्णावर करता येत नाही. अगदी मोजके रुग्ण निवडावे लागतात; कारण हृदयात पाहण्यासाठी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी अतिशय कमी जागा उपलब्ध असते; त्यामुळे रुग्णांची निवड अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आत्तापर्यंत १५-२० टक्के रुटिन शस्त्रक्रिया रुग्णांवर किमान तीव्र / आक्रमक शस्त्रक्रिया होऊ शकते. नंतर हा आकडा वाढूदेखील शकतो.
आदर्श शस्त्रक्रिया पद्धत
हाडांना कापले न जाणे या वास्तविकतेसारखे किमान तीव्रता (मिनिमल इन्व्हेसिव्ह) असलेल्या कार्डिॲक शस्त्रक्रियेचे पारंपरिक तंत्रांच्या तुलनेत बरेच फायदे आढळतात. यामुळे वेदना कमी होते. त्याचप्रमाणे रुग्ण सर्वसामान्य जीवन जगू शकतात. बहुतांश रुग्णांमध्ये रक्ताचा व्यय कमी होण्यामुळे ब्लड ट्रान्स्फ्युजनची आवश्यकता भासत नसल्याने रक्तामुळे होणाऱ्या संक्रमणापासून बचाव होतो. यामुळे संक्रमणाला कमी प्रतिरोध असलेल्या, मधुमेह असणाऱ्या आणि वयस्क रुग्णांसाठी ही प्रक्रिया आदर्श ठरते.
- डॉ. मंगेश कोहळे, कार्डिओ थोरिॲक सर्जन