नव्या मेट्रोचे कमीत कमी तिकीट १०, तर जास्तीत जास्त ८० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 06:47 AM2021-05-30T06:47:25+5:302021-05-30T06:47:48+5:30
दोन्ही प्रकल्पांतून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करतील. तर मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमध्ये सहापैकी एक डबा महिलांसाठी राखीव असेल.
- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात येत्या काही दिवसांत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ प्रवाशांना घेऊन धावणार असून, या दोन्ही मेट्रो रेल्वेचे तिकीट सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारे असेल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला असून, सहा डब्यांच्या ट्रेनकरिता प्रवासी भाडे दराचा विचार करता हे भाडे कमीत कमी १० रुपये, तर जास्तीत जास्त ८० रुपये असेल.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ दोन टप्प्यांत सुरू होतील. डहाणूकर वाडी ते आरे हा सुमारे २० किमी लांबीचा पहिला टप्पा सप्टेंबर २०२१ मध्ये, तर उर्वरित संपूर्ण मार्ग जानेवारी २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू हाेईल. मुंबईत सप्टेंबर २०२१ पर्यंत १० मेट्रो दाखल होतील. बीईएमएल, बंगळुरू हे हिताची, जपान यांच्या तांत्रिक सहकार्याने प्रथमच मेट्रोचे सेट तयार करत आहेत. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही प्रकल्पांतून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करतील. तर मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमध्ये सहापैकी एक डबा महिलांसाठी राखीव असेल. याव्यतिरिक्त प्रत्येक डब्यात चार जागा महिलांसाठी राखीव असतील.
दोन्ही प्रकल्पांतून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करतील. तर मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमध्ये सहापैकी एक डबा महिलांसाठी राखीव असेल. याव्यतिरिक्त प्रत्येक डब्यात चार जागा महिलांसाठी राखीव असतील.
वेळ वाचेल, प्रदूषण होणार नाही
३० ते ३५ टक्के रस्ते प्रवासी वाहतूक मेट्रोमध्ये स्थलांतरित होईल. उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण १२ व्यक्ती/चौरस मीटरहून ७ व्यक्ती/चौरस मीटर कमी होईल. प्रत्येक मार्गाद्वारे प्रवास वेळेत ३० ते ४० मिनिटांची बचत होईल. सर्व मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर दरवर्षी सुमारे २ लाख ५० हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होईल.
- आर. ए. राजीव, महानगर आयुक्त,
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
एमएमआरडीए; प्रत्येक ट्रेनमध्ये सहापैकी एक डबा महिलांसाठी राखीव
अशी जोडणार मुंबई
मेट्रो २ अ दहिसर पूर्व ते डी. एन. नगर असा आहे. दहिसर येथे मार्ग ७, शास्त्रीनगर येथे ६, डी. एन. नगर येथे मार्ग ७ सोबत जोडला जाईल. मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा पश्चिम द्रुतगती मार्गाच्या बाजूने जाईल. हा मार्ग अंधेरी येथे मार्ग १, जोगेश्वरी जेव्हीएलआ येथे मार्ग ६ आणि दहिसर येथे मार्ग २ अ सोबत जोडला जाईल.
अंतर भाडे
(किमी) (रुपये)
०-३ १०
३-१२ २०
१२-१८ ३०
१८-२४ ४०
२४-३० ५०
३०-३६ ६०
३६-४२ ७०
४२ ८०