Join us

किमान तापमानाचा पारा घसरला; मुंबई १५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचे किमान तापमान सातत्याने खाली उतरत असून, बुधवारी यात आणखी घट झाली. येथील किमान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे किमान तापमान सातत्याने खाली उतरत असून, बुधवारी यात आणखी घट झाली. येथील किमान तापमान १५.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, हा चालू हंगामातील नीचांक आहे.

पनवेल, पवई आणि गोरेगाव येथील किमान तापमानाची नोंद १४ अंश झाली असून, सांताक्रुझ आणि कांदिवली येथील किमान तापमान १५ अंश एवढे नोंदविण्यात आले. किमान तापमानाचा पारा खाली आल्याने मुंबईच्या थंडीत भर पडली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानाची नोंद २० अंशाखाली होत आहे. रविवार मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले. सोमवारीही हीच परिस्थिती होती. मंगळवारी किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर बुधवारी हे आणखी खाली आहे आणि किमान तापमानाची नोंद १५ अंश झाली.

नाताळ सुरू असेपर्यंत किमान तापमान खाली राहील. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान खाली राहील. त्यानंतर मात्र, किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

* विदर्भात थंडीचा कडाका वाढला

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून, बहुतांश शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदविण्यात येत आहे. येथील शीत वारे आता दक्षिण भारतात वाहू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून मध्य प्रदेश आणि त्या खालील राज्य गारठत आहेत. विशेषतः विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे, शिवाय मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान खाली आले आहे. मराठवाड्यातही अनेक जिल्ह्यांत किमान तापमान खाली उतरले असून, या थंडीत आणखी भर पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

-------------------------