लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बुधवारी सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे ११.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किमान तापमानात पुढील काही दिवसांत आणखी घसरण होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही किमान तापमानाचा पारा खाली येईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ नोंदविण्यात आली. मराठवाड्याच्या बहुतांश भागात, तर विदर्भातील बऱ्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमान ११ अंशांच्या आसपास खाली उतरण्याची शक्यता असून, आजघडीला राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
.......................