मुंबईचे किमान तापमान १६ अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:05 AM2021-02-07T04:05:57+5:302021-02-07T04:05:57+5:30
पुणे गारठले; सर्वात कमी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, ...
पुणे गारठले; सर्वात कमी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईच्या किमान तापमानात आता घट नोंदविण्यात येऊ लागली आहे. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे ११.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानाचा पारा खाली घसण्याचा ट्रेंड आणखी दोन दिवस कायम राहील, त्यानंतर मात्र किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
डिसेंबर महिन्यापासून मुंबईत बऱ्यापैकी थंडीला सुरुवात झाली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या सुरुवातीसह मध्यात किमान तापमानात घट झाली. या मधल्या काळात तापमान बऱ्यापैकी खाली घसरल्याने मुंबईकरांना थंडीचा आनंद घेत आला. मात्र हवामानात झालेल्या बदलाने पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली. त्यानंतर आता ६, ७ आणि ८ असे सलग तीन दिवस मुंबईतील किमान तापमान खाली राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.
* कमी दाबाचा पट्टा विरला
आग्नेय मध्य प्रदेश व लगतचा भाग ते विदर्भापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा आता विरला आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
* शनिवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई १६, पुणे ११.३, जळगाव १३.७, महाबळेश्वर १३, मालेगाव १४.२, नाशिक १२, सांगली १६.२, सातारा १४.९, सोलापूर १५.८, उस्मानाबाद १५.४, औरंगाबाद १४.९, परभणी १५.९, अकोला १४.४, अमरावती ११.९, बुलडाणा १५.६, गोंदिया १४, वर्धा १६.४.
.........................................