मुंंबईचे किमान तापमान २५ अंश
By Admin | Published: November 18, 2016 02:33 AM2016-11-18T02:33:55+5:302016-11-18T02:33:55+5:30
राज्याच्या दक्षिणेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह मुंबईतील ढगाळ हवामानामुळे शहराच्या किमान
मुंबई : राज्याच्या दक्षिणेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह मुंबईतील ढगाळ हवामानामुळे शहराच्या किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. हवामानातील बदलामुळे मुंबईचे किमान तापमान १६ अंशावरून २५ अंशावर पोहोचले आहे. परिणामी, ऐन थंडीच्या दिवसांत वातावरणातील उकाडा वाढला आहे. या वाढत्या उकाड्याने मुंबईकर अत्यंत त्रस्त झाले आहेत.
मागील आठवड्यात राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला होता. नाशिकसह पुणे शहराचे किमान तापमान ८ ते १० अंश एवढे नोंदवण्यात आले होते, शिवाय मुंबईच्या किमान तापमानातही घट झाली होती.
मुंबईचे किमान तापमान १६ ते १८ अंशावर घसरले होते. परिणामी, मुंबईसह राज्यात चांगलाच गारठा पडला होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या हवामानात बदल होत आहेत.
मुख्यत: ठिकठिकाणी मळभ नोंदवण्यात येत असून, राज्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत मागील दोन दिवसांपासून काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने, उकाड्यात वाढ नोंदवण्यात येत आहे.
गुरुवारसह शुक्रवारीही अशीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना किमान आणखी दोन दिवस तरी उकाड्यासह वाढत्या किमान तापमानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)