Join us

आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' ही ओळख हटवली?; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 2:44 PM

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' असल्याची ओळख हटवल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' असल्याची ओळख हटवल्याची चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी मंत्री हा शब्द ट्विटरवरुन काढल्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडूनही टीका करण्यात येत आहे. परंतु आदित्य ठाकरे यांनी खरचं ट्विटरवरील आपल्या माहितीमधून मंत्री हा शब्द काढला का, याबाबत शिवसेनेने स्पष्टीकरण दिलं आहे.

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; पती- पत्नीने खातं उघडल्यास दर महिन्याला मिळेल दुप्पट फायदा

आदित्य ठाकरेंनी मंत्री हा शब्द काढल्याच्या चर्चांवर शिवसेना म्हणते की, आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये 'महाराष्ट्र पर्यटन आणि पर्यावरण मंत्री' असं लिहिलंच नव्हतं. आदित्य ठाकरेंनी फक्त इन्स्टाग्राम अकाउंटवर मंत्री हा शब्द लिहिला आहे. तसेचा आदित्य ठाकरेंनी गेल्या वर्षभरापासून ट्विटर प्रोफाइलमध्ये कोणताच बदल केलेला नाही, असं शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. सीबीआय सोबतच ईडी देखील  सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत आहे रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचं नावदेखील घेतलं जात आहे. मात्र आदित्य ठाकरेंना मी कधीही भेटले नाही, असं रियानं निवेदनात म्हटलं आहे. तिचे वकील सतीश माने शिंदेंनी हे निवेदन प्रसिद्ध केलं होतं. यामध्ये 'आदित्य ठाकरे कोण आहेत हे रियाला माहीत नाही. ती त्यांना कधीही भेटलेली नाही. तिनं त्यांच्यासोबत फोनवरून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कधीही संवाद साधलेला नाही,' असं स्पष्टीकरण रियाच्या वतीनं माने शिंदेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे.

तत्तपूर्वी, राज्य सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करत आहे, बहुदा महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाभाजपाट्विटरराजकारण