- मनोहर कुंभेजकर
मुंबई :आपल्या रोजच्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढत आजच्या आदिवासी दिना निमीत्त राज्याचे पर्यटन, पर्यावरण व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी चक्क आज आरेच्या आदिवासी नागरिकांबरोबर त्यांच्या पारंपरिक नृत्त्यावर ठेका धरला. यावेळी आदिवासी बांधवांसह उपस्थित शिवसैनिकांचा आनंद द्विगुणित झाला. आजच्या आदिवासी दिना निमित्त गोरेगाव पूर्व आरे कॉलनी येथील पिकनिक स्पॉट समोर असलेल्या बिरसा मुंडा चौकात येथील आदिवासी बांधवांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी येथे आल्यावर त्यांना तेथील आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्त्यावर ठेका घेण्याची विनंती केली असता त्या विनंतीला मान देत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या समवेत ठेका धरत पारंपारीक नृत्त्य केले.
महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यावर आरे येथील मेट्रो कार शेड प्रकल्प रद्द करण्यात मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाची भूमिका निभावल्याने आदित्य ठाकरे यांच्या रूपाने वाघदेव पावला अशी येथील आदिवासी बांधवांची दृढ भावना झाली असून युवासेनाप्रमुखांनी येथील आदिवासी बांधवांचे चांगले सूत जमले आहे. गेल्या आठवड्यात येथील आदिवासी बांधवांच्या लसीकरणासाठी मंत्री आदित्य ठाकरे येथे आले होते आणि आज आदिवासी दिना निमित्त त्यांनी येथे उपस्थित राहून आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी आपल्या भाषणात मंत्री आदित्य ठाकरे यानी सांगितले की,आमचे सरकार येथील आदिवासी बांधवां बरोबर असून त्यांच्या अधिकारांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्याचा सन्मान सरकार करेल असे आश्वासन दिले. यावेळी स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर,शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार,माजी महापौर सुनील प्रभू, महिला विभाग संघटक व नगरसेविका साधना माने, उपविभागप्रमुख विष्णू सावंत, स्थानिक नगरसेविका रेखा रामवंशी,शाखाप्रमुख विलास तावडे, शाखाप्रमुख संदीप गाढवे, माजी नगरसेवक जितेंद्र वळवी आणि आदिवासी संघटनांचे विविध पदाधिकारी इतर कार्यकर्ते उपस्थित होते.