मुंबई- दगाफटका करणारे, पळून जाणारे जिंकत नाहीत. महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही याचा पूर्ण विश्वास आहे असं राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज माथेरानचे नगरसेवक प्रसाद सावंत यांची कळंबोली येथील रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर कर्जत विभागातील शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
बंडखोर आमदार खोटं बोलत आहेत. शिवसेना नावाचा दूसरा गट बनूच शकत नाही. बंडखोर आमदारांकडे दोनच पर्याय आहेत. ते म्हणजे भाजपात किंवा मनसेत विलीन व्हायचा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच मी या फुटीरवाद्यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही, मी यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारेन की, तुमच्यासाठी आम्ही काय कमी केलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे तुम्हाला पाडलं नाही तर माझं नाव आदित्य नाही, असा इशारा देखील आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
तत्पूर्वी, विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह मविआच्या ५० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं याचिकेत म्हणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेनेने नोटीस पाठवली. याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावली.
आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना ५ दिवसात उत्तर देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत १६ आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. ११ जुलैला पुढील सुनावणी होतपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ११ जुलै ५.३० पर्यंत १६ आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे-
जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे खातं शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसेच गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.