Join us  

अयोध्या दौऱ्यावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना आदित्य ठाकरे घाबरणारे नाही- उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:05 PM

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई- मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिलं आहे. 

आदित्य ठाकरे यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांची उंची आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोठी आहे, असं वाटत नाही असा टोला शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी नितेश राणेंचे नाव न घेता लगावला आहे. विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून आदित्य ठाकरे हे काही घाबरणारे नाही, उलट ते दौरा यशस्वी करून नक्की परत येतील असा विश्वास देखील उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. 

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी अयोध्येत विविध ठिकाणी भेटी दिल्या. आपल्या या दौऱ्यात काहीही राजकारण नसून भगवान राम यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी झाल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, सर्व केंद्रीय एजन्सी प्रचार साहित्य बनल्या आहेत. 

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारशी चर्चा करणार असल्याचे शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.   अयोध्या हे देशाच्या आस्थेचे केंद्र आहे. २०१८ मध्ये आम्ही ही घोषणा दिली की, ‘प्रथम मंदिर, नंतर सरकार’आणि शिवसेनेच्या या घोषणेनंतर मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. आम्ही भगवान रामाला प्रार्थना करतो की, आम्हाला शक्ती द्यावी, जेणेकरून लोकांची चांगली सेवा करता येईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :आदित्य ठाकरेउदय सामंतशिवसेनाभाजपा