महाराष्ट्र सदनात जवानांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन; आदित्य ठाकरेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 07:21 PM2020-02-19T19:21:39+5:302020-02-19T22:07:59+5:30
महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी आदेश काढून कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले आहे.
मुंबई : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांच्या मुळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळविण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते.
महाराष्ट्र सदन येथे आज सकाळी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सैन्य दलाच्या गोरखा रेजिमेंटचे बँड पथक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर पथकातील जवान सदनच्या उपहारगृहात जेवणासाठी गेले होते. त्यावेळी सदनचे सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना तिथे बसण्यास विरोध केला. जवानांना बाहेरच्या सार्वजनिक डायनिंग हॉलमध्ये बसण्यास सांगितले आणि त्यांच्याशी हुज्जत घातली. यावर कार्यक्रम आयोजकांनी आक्षेप घेतला व ते जवानांसह सदनाबाहेर पडले.
जवानांसोबत झालेल्या या दुर्व्यवहाराच्या प्रकरणाची माहिती मिळताच राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेऊन सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा करुन माहिती घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी संबंधित सहायक निवासी आयुक्तावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले.
त्यानुसार महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी आदेश काढून कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले आहे. तसेच जवानांशी केलेल्या दुर्व्यवहारप्रकरणी कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांची मुळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळविण्यात आले आहे. कायरकर हे महाराष्ट्र सदनला प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.
काय घडलं होतं?
पहाटे ६ वाजल्यापासून हे जवान महाराष्ट्र सदनात उपस्थित होते. गोरखा रेजिमेंटचे जवान कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत, पहिल्यांदाच शिवजयंतीच्या निमित्ताने हे जवान महाराष्ट्र सदनात आले होते. या जवानांना कॅन्टीनमध्ये बोलवण्यात आलं होतं. त्यांना जेवणासाठी ताटं वाढून ठेवलं होतं. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर यांनी तुम्हाला इथं जेवता येणार नाही, तुमची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे असं सांगत त्यांना कॅन्टीनमधून बाहेर काढलं यावरुन काहीवेळ तणाव निर्माण झाला.
महत्त्वाच्या बातम्या
Shame! जेवणाच्या ताटावरुन आर्मी जवानांना अक्षरशः हाकललं; महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार
100 कोटी खर्च, 45 कुटुंबीयांना हटविलं तरीही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून डीलला नकार, काँग्रेसची टीका
“ट्रम्प येता दारी, गरीबांची चिंता कोण करी”; राष्ट्रवादीकडून मोदींवर टीका
क्या बात है... नितीन गडकरी सुप्रीम कोर्टाला 'आयडिया' सांगणार; खुद्द सरन्यायाधीशांनीच दिलं आमंत्रण
छत्रपती शिवराय अन् संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद लिखाण; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट