आदित्य ठाकरेंनी घेतला गोराई गावातील मुलभूत सुविधांचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 09:11 PM2021-01-08T21:11:41+5:302021-01-08T21:13:02+5:30

आज दुपारी सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या परिमंडळ 7 च्या शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी परिमंडळ 7 येथील  विविध समस्यांसह गोराई गावातील  मूलभूत सुविधांचा आढावा घेतला.

minister Aditya Thackeray reviewed the basic facilities in Gorai village | आदित्य ठाकरेंनी घेतला गोराई गावातील मुलभूत सुविधांचा आढावा

आदित्य ठाकरेंनी घेतला गोराई गावातील मुलभूत सुविधांचा आढावा

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

मुंबई: बोरिवली खाडीपलीकडे असलेल्या सुमारे 12000 लोकवस्तीच्या गोराई गावाला आजही स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतर आरोग्य, शिक्षण, पाणी या मूलभूत सुविधा नाही. आज दुपारी सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या परिमंडळ 7 च्या शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी परिमंडळ 7 येथील  विविध समस्यांसह गोराई गावातील  मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. गोराई गावाच्या समस्या सुटण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच येथे भेट देण्यात येईल असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

या बैठकीत परिमंडळ 7 च्या आर दक्षिण( कांदिवली),आर मध्य (बोरिवली),आर (उत्तर) येथील शिवसेनेचे सर्व 12 नगरसेवक,परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार,आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे,आर उत्तरच्या वॉर्ड ऑफिसर संध्या नांदेडकर,आर दक्षिणचे वॉर्ड ऑफिसर संजय कुऱ्हाडे, शासनाचे संबधीत अधिकारी उपस्थित होते.

गोराई गावातील नागरिकांना 24 तास आरोग्य व प्रसुतीची सुविधा उपलब्ध नाही, पालिकेचा दवाखाना सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उघडा असतो,येथे शाळा व महाविद्यालयाची गरज आहे,पाण्याचा प्रश्न आहे अश्या समस्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मांडल्या. गोराई गावाला विशेष दर्जा देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी डीपी मध्ये भूखंड आरक्षित करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. गोराई गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या कांदिवली पश्चिम आर दक्षिण वॉर्ड मधील त्यांच्या दालनात  माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत व विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांनी महत्वाची बैठक  दि,21 डिसेंबर रोजी आयोजित केली होती.अशी माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली.

मुंबईत 189 गावठाणे असून त्यांचा विकास निधी गेल्या दोन तीन वर्षांपासून पालिकेने बंद केला आहे तो परत सुरू करण्यात यावा,तसेच दहिसर कांदरपाडा येथे आगरी कोळी भवन बांधण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

गोराई गावाच्या समस्यांसाठी लोकमतचा पाठपुरावा
लोकमतने येथील समस्यांवर प्रकाशझोत टाकून पालिका व शासनाचे लक्ष वेधले होते. या संदर्भात लोकमत ऑनलाईन व लोकमतच्या दि,8 डिसेंबरच्या व दि. 12 डिसेंबरच्या अंकात या संदर्भात सविस्तर वृत्त दिले होते. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दि,12 डिसेंबर रोजी गोराई गावाला भेट दिली होती. गोराई मथाई चर्चचे फादर एडवर्ड जसिंतो, गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जोजफ कोलासो,सचिव रॉकी किणी,राज्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अभिषेक सामाजिक व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे यांनी त्यांच्याकडे मांडल्या होत्या.

काय आहेत समस्या
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गोराई व लगतच्या कुलवेम व मनोरी ही तीन गावे मूलभूत व आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवले आहे. आजही येथे सुसज्ज हॉस्पिटल नाही, ऍम्ब्युलन्सची व बाळांतपणाची व डायलिसिसची सुविधा नाही. जर इमरजन्सीत कोणतीही आरोग्य समस्या उद्भवल्यास येथील नागरिकांना बोरिवलीला 20 ते 25 किमी वळसा घालून जावे लागते. यामध्ये नागरिकांचा प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गोराई गावात पालिकेचा दवाखाना आहे. सदर दवाखाना सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत सुरू असतो. त्यानंतर जर आरोग्य समस्या उद्भवल्यास डॉक्टर नसल्याने औषध उपचार होत नाही. त्यामुळे येथे 24 तास डॉक्टरची नितांत गरज असून सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याची  गोराईकरांची मागणी आहे.

पालिकेचा 2034 च्या नव्या डीपीत येथील कोळीवाडे अधोरेखित केले नाही. येथील नागरिकांना पाणी जोडणी हवी असेल आणि घर बांधणी करायची असेल तर पालिका पुरावा मागते. येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो.

गोराई गावात 10 वी पर्यंत तर मनोरी गावात चौथी पर्यंत शाळा आहे. येथे लॉ कॉलेजसाठी भूखंड राखीव होता. मात्र कॉलेज काही झाले नाही. येथें महाविद्यालयाची नितांत गरज आहे.

Web Title: minister Aditya Thackeray reviewed the basic facilities in Gorai village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.