Join us

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने सुटला मासळी मार्केटचा प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 2:56 PM

मासळी मार्केटचा प्रश्न आणि इतर समस्यांबाबत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व इतर संघटनांनी एकत्र येत पालिका मुख्यालयात आक्रोश मोर्चा काढला आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- क्रॉफर्ड मार्केट,छत्रपती शिवाजी महाराज मंडई व ऐरोली मार्केटमुळे निर्माण झालेला मासे विक्रीचा तिढा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने आता सुटला आहे.

या मासळी मार्केटचा प्रश्न आणि इतर समस्यांबाबत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व इतर संघटनांनी एकत्र येत पालिका मुख्यालयात आक्रोश मोर्चा काढला आहे. मात्र मुंबईचे माजी महापौर व महिमचे विद्यमान नगरसेवक मिलींद वैद्य यांनी मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधी बरोबर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बरोबर बैठक काल सायंकाळी आयोजित करून गेले काही दिवस चर्चेत असलेला मासळी बाजरांचा प्रश्न सोडवला आहे. लोकमत ऑनलाईन आणि लोकमतने सातत्याने गेले काही दिवस मासळी बाजारांचा प्रश्न मांडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मंडई ही धोकादायक स्थितीत असल्याने निष्कासित करून पर्यायी मासेविक्रेत्या महिलांना ऐरोली येथे पर्यायी जागा दिल्यामुळे मच्छीमार समाजात असुरक्षतेची भावना झाली होती. तसेच मच्छिमार मासे विक्रेत्या महिलांचे आर्थिक नुकसानही होत होते. या कारणास्तव यातून मार्ग काढण्याकरिता काल सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहात राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनपा अधिकारी यांना पाचारण करून छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील परवाना धारक विक्रेते, घाऊक विक्रेते, किरकोळ महिला विक्रेत्या यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली. 

या सभेत छत्रपती शिवाजी महाराज मंडईत (सध्याच्या) मोकळ्या जागेत किरकोळ मासे विक्रेत्या महिलांकरिता येत्या १० दिवसात शेड व घाऊक मासेविक्रेत्याना १ महिन्याच्या आत कॉक्रीटीकरण करून जागा तयार करण्यात येईल याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे महिनाभरानंतर कोणत्याही मासे विक्रेत्याना ऐरोली मार्केटमध्ये जावे न लागता पूर्ववत मूळ जागेवर व्यवसाय करता येणार आहे. तसेच क्राॅफर्ड मार्केट मधील नियोजित वास्तूमध्ये मासे विक्रेत्यांना कशाप्रकारे सामावून घेतले जाईल याचे सादरीकरण संबंधितांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसांत करण्यात यावे व याबाबत त्यांच्या सूचनांची दखल घेतली जावी असेही आदेश  आदित्य ठाकरे यांनी महानगर पालिका अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे मासे विक्रीचा झालेला तिढा सुटलेला आहे,तसेच क्रॉफर्ड मार्केटचा पुर्नविकास झाल्यानंतर जे कोणी किरकोळ व घाऊक परवाना धारक विक्रेते आहेत त्यांना कायमस्वरूपी क्रॉफर्ड मार्केट तळ मजल्यावर सामावून घेण्यात येणार आहे.

 आजच्या बैठकीला पालिका उपायुक्त रमेश पवार,महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष, रामदास संधे, संचालिका ज्योती मेहेर, संचालक संदिप बारी, व्यवस्थापक पांडुरंग टिळे,ठाणे जिल्हा मच्छिमार संघ अध्यक्ष जय कुमार भाये,फ्रेश फिश असोसिएशनचेबळवंतराव पवार, मत्स्य घाऊक व्यापारी संघाचे अक्षय घिवलीकर, वेसावे मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष नचिकेत जागले,शाखाप्रमुख स्वप्नील कोळी उपस्थित होते.  सहाय्यक आयुक्त (बाजार) यांच्या स्वाक्षरीने लेखी पत्र घेण्यात आले आहे अशी माहिती रामदास संधे यांनी दिली. 

टॅग्स :मच्छीमारआदित्य ठाकरेमुंबईशिवसेना