मुंबई- २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह ८ नेत्यांनी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. एकाबाजूला अजित पवार यांचा गट तर दुसरीकडे शरद पवार यांचा एक गट. पवार कुटुंबातही यामुळे फूट पडल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान काल अजित पवार हे शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार हे शरद पवारांच्या घरी गेल्याने चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आज या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार की अजित पवार, आमदार सरोज अहिरे यांचा पाठिंबा कोणाला? जाहीर केली भूमिका, म्हणाल्या..
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अंतर्मनाची साद ऐकून सिल्वर ओकवर गेलो. राजकारण वेगळं मात्र परिवार वेगळा. काल काकींचं ऑपरेशन होतं. त्यांच्या हाताला दुखापत झाली होती, काल दिवसभर माझं काम सुरू होतं. यानंतर मी सुप्रिया सुळे यांना फोन केला. तर त्यांनी मला सिल्वर ओकवरच बोलावलं. मला काकींना भेटायचं होतं, म्हणून मी सिल्वर ओकवर गेलो होतो. यावेळी शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळेही तिथे उपस्थित होत्या.
यावेळी सिल्वर ओकवर आमच राजकारणावर कोणतही बोलणं झालेलं नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार वेगळा असतो. आम्हाला आजी, आजोबांनी हे शिकवलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.
आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केला पाठिंबा
आज अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे मी त्यांच स्वागत करण्यासाठी आले आहे. मी आता मतदारसंघात सगळ्यांशी चर्चा केली आहे. माझा निर्णय जवळपास झाला आहे. शरद पवार वडिलांसारखे आहेत, तर अजित पवार भावासारखे आहेत. अजितदादांनी भावासारखं प्रेम दिलं, असंही अहिरे म्हणाल्या.
'माझी द्विधा मनस्थिती होती. माझी ९० टक्के लोकांशी चर्चा केली आहे. देवळाली मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सत्तेत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मी अजित पवार यांना पाठिंबा देणार आहे, असंही सरोज अहिरे म्हणाल्या.