पालिकेला वर्सोव्याचे काळसेकर हॉस्पिटल ताब्यात घेण्यात महाआघाडी सरकारच्या मंत्र्याचा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 05:25 PM2020-06-23T17:25:42+5:302020-06-23T17:26:02+5:30
वर्सोवा कोळीवाडा हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला असून दि,19 जूनपर्यंत येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 388 इतकी झाली असून आतापर्यंत 14 रुग्ण मृत्युमुखी पडले होते.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : वर्सोवा कोळीवाडा हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला असून दि,19 जूनपर्यंत येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 388 इतकी झाली असून आतापर्यंत 14 रुग्ण मृत्युमुखी पडले होते. याठिकाणी पुरेसे बेड उपलब्ध नाही,अँम्ब्युलन्स उपलब्ध होत नसल्याने वेळेवर रुग्णांवर उपचार होत नाही. त्यामुळे वर्सोवा कोळीवाड्यानजिक असलेले 100 बेडचे सुसज्ज व 100 टक्के सरकारी अनुदानावर चालणारे अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्टचे युनानी मेडिकल कॉलेज व काळसेकर हॉस्पिटल ताब्यात घ्यावे व वर्सोव्यातील वाढत चाललेल्या कोविड रुग्णांसाठी सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी के पश्चिम सहाय्यक पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती.मात्र महाआघाडी सरकारच्या एका बड्या मंत्र्यांच्या आणि महाआघाडी सरकारच्या एका मान्यवर पक्षाच्या नेत्याच्या दाबावामुळे पालिकेला वर्सोवा,यारी रोड येथील काळसेकर हॉस्पिटल ताब्यात घेण्यात अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून सदर हॉस्पिटल महापालिकेने ताब्यात घेण्याचे आदेश द्यावे अशी आग्रही मागणी वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सदर हॉस्पिटल पालिकेने कोविडसाठी ताब्यात घ्यावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले.त्यानुसार मुंबई महापालिकेने कायदेशीर पूर्तता करून सदर युनांनी कॉलेज व हॉस्पिटल ताब्यात घेण्याचे गेल्या 9 मे रोजी आदेश दिले. या आदेशामुळे वर्सोवा कोळीवाडा आणि संबंधित भागातील रुग्णांची खूप मोठी सोय होणार आहे. रुग्ण वाचण्याकरिता मोठी मदत होणार आहे. असे असताना आपल्या मंत्रिमंडळातील एक जेष्ठ मंत्री महोदय आणि आपल्या नेतृत्वाखाली काम करणारे महा विकास आघाडीतील एका मान्यवर पक्षाचे नेते सदरील रुग्णालय मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घेऊ नये याकरिता अडथळा निर्माण करत आहेत. पालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर दबाव आणत आहेत असा आरोप आमदार लव्हेकर यांनी केला आहे.
दररोज मुंबईत कोविड 19 चे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशावेळी आपल्याच मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री महोदय व आपल्या नेतृत्वाखाली काम करणारे महाविकास आघाडीतील एका मान्यवर पक्षाचे नेते काळसेकर हॉस्पिटल मुंबई महापालिकेने ताब्यात घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणतात हे माणुसकीला काळिमा फासणारे वर्तन आहे. या वर्तनाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. जबाबदारीच्या पदावर राहून बेजबाबदार वागणाऱ्या संबंधित ज्येष्ठ मंत्री महोदयांना व ज्येष्ठ नेते यांना कडक शब्दात माणुसकीची व आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी व काळसेकर हॉस्पिटल ताब्यात घेण्यामधला अडथळ दूर करावा अशी मागणी आमदार लव्हेकर यांनी आपल्या पत्राद्वारे केला आहे.
संबंधित युनानी मेडिकल कॉलेज आणि काळसेकर हॉस्पिटल हे तीन एकर जागेवर बांधण्यात आलेले आहे. 100 बेडचे अध्यावत रुग्णालय असून याव्यतिरीक्त 10 बेडचे आयसीयू आहे. 6 बेडचा आयसोलेशन वार्ड आहे. अकरा बेडचा हायस पेशंट वार्ड आहे. तसेच डायलेसिसच्या सहा मशिन्स उपलब्ध आहेत. दोन व्हेंटिलेटर मशीन असून एक वेंटिलेटर मशीन लहान मुलांसाठी ठेवण्यात आली आहे. शिवाय दोन मोठ्या डीलक्स रूमही उपलब्ध आहेत.
आपण स्वतः जातीने लक्ष घालून 100% सरकारी अनुदानावर चालणारे शंभर बेडचे काळसेकर हॉस्पिटल वेगाने वाढत चाललेल्या माझ्या मतदारसंघातील कोविड रुग्णांसाठी महापालिकेने ताब्यात घ्यावे आणि वर्सोवा मतदारसंघातील कोविड 19 रुग्णांची सोय करावी अशी विनंती आमदार लव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
दरम्यान के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी बोलण्यास नकार दिला.