मंत्री अन् आमदारांना पावसाचा फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅक वरून पायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:41 AM2024-07-08T11:41:48+5:302024-07-08T11:44:08+5:30
Rain Update : कालपासून मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका रेल्वेसह अन्य वाहनांना बसला आहे. अनेक लोकल रेल्वे गाड्यांना फटका बसला आहे.
Rain Update ( Marathi News) : कालपासून मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका रेल्वेसह अन्य वाहनांना बसला आहे. अनेक लोकल रेल्वे गाड्यांना फटका बसला आहे. या पावसाचा फटका मंत्री आणि आमदारांनाही बसला आहे. मंत्री अनिल पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांनाही कुर्ला आणि दादरच्या मध्येच ट्रॅकवरुन चालत यावं लागलं आहे.
कुर्ला स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही फटका बसला आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, रविवारच्या सुट्टीनंतर आमदार रेल्वेने मुंबईत येत आहेत. पावसाचा फटका या नेत्यांनाही बसला आहे. मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना रेल्वे ट्रॅकवरुन चालत यावे लागले. यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, आजच्या पावसामुळे मला आणि मंत्री अनिल पाटील अडकून आहोत. या ट्रेनमध्ये अजून काही आमदार अडकले आहेत. आज आम्हाला हा वेगळाच अनुभव मिळाला आहे, असंही आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
पावसाचा मंत्री अन् आमदारांना फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रक वरून पायी प्रवास#rainpic.twitter.com/1gMCxTx3fd
— Lokmat (@lokmat) July 8, 2024
'या' भागात ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस कोसळणार
कालपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुढचे आणखी चार दिवस जोरदार पाऊस असणार आहे, मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या भागात ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढचे पाच दिवस दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.