Join us

शरद पवारांना बदनाम करण्याचा अजेंडा; मात्र ते घाबरणारे नाही, हसन मुश्रीफांचा राज ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 8:29 PM

मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही. तो सामाजिक आहे. मात्र ज्याला कोणाला हा धार्मिक विषय वाटत असेल, त्यांना मग आम्ही धर्मानेचं उत्तर देऊ, असा थेट इशारा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी १ मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत दिला.

राज ठाकरेंनी या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. शरद पवार हे त्यांना जे सोयीचे आहे तेच वाचतात. जेम्स लेन आणि दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचा संबंध दाखवून मराठा समाजाची माथी भडकविण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरे यांनी घराघरात पोहोचविले, परंतु ते ब्राह्मण असल्याने त्यांचा द्वेष केला, असा आरोपही राज ठाकरेंनी शरद पवारांवर केला.

राज्यात समाजवाद, बुद्धीजम, हिंदुजम, कम्युनिजम विचार होता. सध्या टिंगलटवाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. देशाला विचारवंत, समाजसुधारक महाराष्ट्राने दिले. मात्र आज राज्याची अवस्था वाईट झालेली आहे. ही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर झाली आहे, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरेंच्या या आरोपानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे. ५५ ते ६० वर्ष शरद पवार समाजकारणात आहेत. राज्याचं राजकारणही त्यांच्याभोवती फिरतं राहिलेलं आहे. शरद पवारांना बदनाम करण्याचा अजेंडा सुरु आहे. मात्र शरद पवार याने घाबरणारे नाहीत, असं हसम मुश्रीफ म्हणाले. 

धनंजय मुंडेंची राज ठाकरेंवर टीका-

राज ठाकरे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात, आणि काय होऊन जाऊ द्यायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तसेच भोंगे काढल्याने आणि हनुमान चालीसा म्हटल्याने देशातील बेरोजगारी संपणार आहे का किंवा महागाई कमी होणार आहे का? हे जर होणार असेल तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करु. मात्र तरुणांची माथी भडकवली तर एक पिढी उद्ध्वस्त होईल, असंही मुंडे यावेळी म्हणाले. 

प्रत्येक धर्मामध्ये आपापल्या परंपरा आणि प्रथा आहेत त्यामुळे त्याचा बाजार मांडण हे प्रगत महाराष्ट्राला परवडणारं नाही. भोंग्याचं भाडं बदललं की राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करतात. शरद पवार यांनी आपल्या हयातीमध्ये कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही. समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन न्याय देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं. 

टॅग्स :राज ठाकरेहसन मुश्रीफमनसे