मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी वीजबिल दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारमधील मंत्री आधी वीजबिल माफ करू म्हटले. पण अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, असं जाहीर केलं. हे सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी आज नवी मुंबईत बेलापूर न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर ठाण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली व यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. आगामी काळात भाजपासोबत जाण्यासाठी राज ठाकरे तयार आहेत. त्यामुळे आज त्यांनी असं विधान केलं, अशी टीका मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय बातम्या होत नाही, असा टोला देखील नवाब मलिक यांनी लगावला आहे.
तत्पूर्वी, राज्य सरकार आणि वीज कंपन्यांचं साटंलोटं असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं हेच कळत नाही. मुलांच्या परीक्षांचाही ते विचार करत नाही. वीज बिल माफ करण्यासाठी कंपन्यांशी बोलावं लागेल. पण या चर्चाच थांबल्या आहेत. मग यात काहीतरी साटंलोटं असल्याशिवाय चर्चा थांबल्या असतील का? सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करतंय, अशी टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत इतकंच लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेनं तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा", असं राज ठाकरे यांनी सांगितलं. शेतकरी आज इतक्या थंडीत तिथं आंदोलन करतोय. आणखी किती दिवस हे प्रकरण चिघळवणार. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी शेतकऱ्यांसोबत एकत्र बसावं आणि प्रश्न सोडवावा, असंही राज ठाकरे पुढे म्हणाले.
शरद पवारांशी नेमकी काय चर्चा झाली?
राज्यपालांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांशी वीजबिलाच्या मुद्द्यावर बोलणं झाल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. "शरद पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला ते पत्र पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएमईबी असेल किंवा टाटा असेला या सर्वांशी शरद पवार बोलणार होते. पण ५-६ दिवसांनी मला कळालं की गौतम अदानी शरद पवारांची भेट घेऊन आले. त्यात काय चर्चा झाली मला माहित नाही. त्यानंतर सरकारने वीजबिल माफ होणार नाही, असं जाहीर केलं. त्यामुळे याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि वीजमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
अयोध्येचा दौरा निश्चित नाही
राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली होती. पण राज यांनी याबाबत अद्यात कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं. "मी फक्त अयोध्येला जायची इच्छा व्यक्त केली. अद्याप कोणताही दौरा निश्चित झालेला नाही", असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.