मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'के न्यूज इस्लामपूर' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी जयंत पाटील यांनी ही इच्छा बोलावून दाखवली आहे.
जयंत पाटील या मुलाखतीत म्हणाले की, आमच्या पक्षाकडे (राष्ट्रवादीकडे) अजून मुख्यमंत्रिपद आलेलं नाही. यावर तुमची इच्छा आहे का, असा सवाल जयंत पाटील यांना मुलाखतीत विचारण्यात आला. दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही वाटणं स्वाभाविक आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
तसेच मुख्यमंत्रिपद मिळावं ही पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा असते. माझ्यासोबत मतदारांना देखील आपण मुख्यमंत्री बनावं, अशी इच्छा असेल. परंतु सध्याची परिस्थिती आणि पक्षाच्या आमदारांची संख्या पाहता हे शक्य नाही. आम्हाला आमदारांची संख्या वाढवावी, लागेल. पक्ष संघटना मजबूत करावं लागेल, असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
दरम्यान, 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीला बहुमत मिळालं. या निवडणुकीत काँग्रेसला 69 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 71 जागा मिळाल्या. काँग्रेसपेक्षा आमच्याकडे जागा जास्त आहेत त्यामुळे मुख्यमंत्रिपद आम्हाला मिळावे अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. पण त्यावेळी काँग्रेसच्या विलासराव देशमुखांनी बाजी मारत मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं.
मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते- जयंत पाटील
मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे किंवा अजित पवार या दोघांपैकी एकाला पाठींबा देण्याची वेळ आल्यास कोणाला पाठींबा देणार या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, "मुळात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना वेगवेगळं समजणं चुकीचं ठरेल. ते एकाच घरातील आहेत''