Join us

कपड्यांचे रंग बदलून हिंदुत्व येत नाही; ते रक्तात असावं लागतं, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 1:48 PM

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राज्यातील सत्तेत सहभागी झाली आणि हिंदुत्वापासून दुरावल्याची टीका भाजपासह विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मराठीसह हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच अडचण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कपड्यांचे रंग बदलून हिंदुत्व येत नाही. हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच आमच्या मनात आणि रक्तात हिंदुत्व आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. 

आदित्य ठाकरे आगामी मे महिन्याच्या सुरुवातील अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण लवकरच दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे. मी याबाबत कालच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केली. अयोध्या दौऱ्याची तारीख काय असावी, याबाबतही संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. 

आज राज ठाकरेंनी केल्या मोठ्या घोषणा-

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. 

भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेराज ठाकरे