मुंबई- बाबरी मशीद पडली त्यावेळी शिवसेनेचे नेते कोणत्या बिळात होते, असा सवाल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुस्टर डोस सभेत उपस्थित केला. तसेच, बाबरी मशीद पडली, तेव्हा शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. बाबरी पतनानंतर आम्ही तुरुंगात होतो. भाजपच्या ३२ नेत्यांवर गुन्हेही दाखल झाले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर शिवसेना नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही यावर भाष्य केलं आहे. १८५७च्या लढ्यात देवेंद्र फडणवीसांचं खूप योगदान आहे, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच आता राज्यासमोर महागाई, बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे, अशं आदित्य ठाकरे म्हणाले.
बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, त्यांचे श्रेय कधीही भाजपने घेतले नाही. तेथे उपस्थित असणारे सर्व रामसेवक, रामभक्त होते. कारसेवक होते. तत्कालीन सरकारनेही कारसेवक घटनास्थळी असण्याचा उल्लेख केला आहे. प्रभू श्रीरामांसाठी लाखो लोकांनी संघर्ष केला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही प्रसिद्धी घेणारे नाही, तर अनुशासन पाळणारे लोकं आहोत. मात्र, राम जन्माला आले होते का, असा प्रश्न विचारण्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. तुम्ही रामाच्या बाजूने आहात की, रावणाच्या बाजूने एकदा सांगून टाका, अशी खोचक टिपण्णीही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना केली.
बाबरी मशीद पाडली, तेव्हा मी सेंट्रल जेलमध्ये होतो-
ते हिंदू नाहीत, असे म्हणून मला हिंदुत्वाची संख्या कमी करायची नाही. हिंदुत्वही आचरण पद्धती आहे, असे सांगतानाच तुमचे सवंगडी जेलमध्ये जातात आणि तरीही ते पदावर असतात, अशावेळी महाराष्ट्राची देशात बदनामी होते, अशी टीका फडणवीस यांनी केली. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आमचे नेते आणि मी स्वतः तेथे होतो. शिवसेनेचा कोणता नेता तेथे होता, हे सांगावे, असे सांगत त्या घटनेवरून फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले.