Join us

"नरेंद्र मोदींचा चेहरा होता, तसाच बाळासाहेबांचा देखील होता अन् त्याचा दोन्ही पक्षांना फायदा झाला"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 9:16 AM

चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई: पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचा ठपका ठेवत भाजपाच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. यावरुन आपली प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी संपूर्ण दिवस तोंडाला पट्टी बांधून सभागृहात बसले होते. कुठल्याही विषयाबाबत चर्चेतून तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्याऐवजी केवळ घोषणा आणि निदर्शने केली म्हणून आमच्या आमदारांचे निलंबन केले, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. 

विधानसभेची समन्वयातून तोडगा काढण्याची परंपरा या सरकारने मोडीत काढली, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिवसेनेचे 56 आमदार आणि 18 खासदार निवडून आले आहेत. आज तेच आमदार सभागृहात भाजपचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून प्रखर संघर्ष करू, असा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, याविषयीच्या राजकारणात आपण जाऊ इच्छित नाही. मात्र युती असल्याने नरेंद्र मोदींचा चेहरा होता, तसाच बाळासाहेब ठाकरे यांचा देखील चेहरा होता आणि त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे हे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  

कोरोनाच्या कठीण काळातही आघाडी सरकारने कशा प्रकारे चांगले काम केले, हे जनतेला चांगले माहीत आहे. त्यामुळे आम्ही विकास कामांवर लक्ष देत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर आणि त्यांच्या जावयावर ईडीच्या कारवाई संदर्भात बोलताना एकनाथ शिंदे यांनी अतिशय सावधपणे प्रतिक्रिया दिले. 'हा चौकशीचा भाग आहे. त्यामुळे यामध्ये आपण आताच बोलणं योग्य ठरणार नाही', असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेचंद्रकांत पाटीलशिवसेनाभाजपा