Join us

'नॉट रिचेबल' असणारे एकनाथ शिंदे गुजरातमध्ये?; १३ आमदारही सोबत असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 8:26 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं. 

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. मात्र या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं. 

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. 

शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती समोर येत आहे.  

शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज बैठक-

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची दुपारी १२ वाजत बैठक बोलावली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदार हजेरी लावणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सरकार म्हणून आता विचार करण्याची गरज

अडीच वर्ष सत्तेत राहूनही पक्षाची मतं फुटत असतील तर सरकार म्हणून आम्हाला विचार करण्याची गरज आता आहे. आपल्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही. आम्हालाच आता विचार करण्याची गरज आहे. अडीच वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं चुकतंय याचा विचार करण्याची गरज आहे. नक्कीच आजच्या निकालाची माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवली जाईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी निकालानंतर दिली.  

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे