Join us  

राज ठाकरेंचे भाषण म्हणजे ऋतूप्रमाणे बदलणारं; त्यांनी कुणाच्या नादी लागू नये- गुलाबराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 10:55 AM

मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. 

राज ठाकरेंच्या टीकेला महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर दिले जात आहे. मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे ऋतूप्रमाणे बदलणारं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सी टीम, डी टीम याच्याशी देणंघेणं न ठेवता राज ठाकरे यांनी कुणाच्या नादी लागू नये. शिवसेनेवर टीका केल्याशिवाय इतर पक्षांचे पोट भरत नाही. राज ठाकरे यांना शिकवण्यायेवढा मी मोठा नाही. मात्र त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण, ध्येय पहावे, असं म्हणत 'भर कट्टी नाव कधीच नैय्या या पार' करू शकत नाही, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. 

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख करत निशाणा साधला. तसंच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं, असा टोलाही लगावला. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

भाजपाचं राजकारण पाहिलंत तर ज्या राज्यात सत्ता हवी आहे तिथे या दोन्ही पक्षांना वापरुन, एकमेकांविरोधात बोलून, काही घटना घडवून, हिंदू मुस्लिम दंगली घडवून सरकार स्थापन कसं करायचं याकडे लक्ष दिसत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच हिंदुत्वासाठी सतत लढण्याची गरज नसते. राजकीय पक्ष म्हणून जी वचनं देतो ती पूर्ण करणंही हिंदुत्व आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ब्लू प्रिंट देणारे राज हेच आहेत का?- मंत्री जितेंद्र आव्हाड

लाखोंच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणे फार सोपे असते. पाच वर्षांपूर्वी जे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करायचे की, असे उद्योग आणले पाहिजेत तसे उद्योग आणले पाहिजे. कधी रतन टाटाशी चर्चा, कधी गोदरेजशी चर्चा, कधी यांच्याशी चर्चा कधी त्यांच्याशी चर्चा, असे एक विकासाचे मॉडेल घेऊन पोरांना नोकऱ्या लावतो, असे म्हणायचे. ब्लू-प्रिंट देणारे राज ठाकरे आता त्याच पोरांना मशिदीच्या बाहेर भोंगे लावण्यास सांगतात. ही विचारांची प्रगती आहे की अधोगती आहे हे समजत नाही, असा टोला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेना