Join us

ईडीच्या कार्यालयात मंत्री अनिल परब गैरहजर राहणार?; आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 7:21 AM

ईडीने बजावलेल्या नोटीसमध्ये केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद करून मंगळवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहावे, असे नमूद केले आहे.

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली असली तरी ते गैरहजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्याकडे कशाबद्दल चौकशी करायची आहे, हे स्पष्ट न केल्याने प्रत्यक्ष हजर न राहता त्याबाबत विचारणा करण्यात येईल, असे समजते.

नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री परब यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना राणे यांच्यावर कारवाई करण्याबाबत मोबाइल फोनवरून सूचना करत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्याबद्दल भाजपाने त्यांच्यावर कारवाई आणि सीबीआय चौकशी करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले होते.

ईडीने बजावलेल्या नोटीसमध्ये केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद करून मंगळवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहावे, असे नमूद केले आहे. त्यांच्याकडे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्रात बीएमसी कॉन्ट्रॅक्टर्सकडून वसुली करण्याबाबत परब यांनी सूचना केल्याचे नमूद केले आहे. त्यानुषंगाने ही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. नोटीसमध्ये काहीही नमूद नसल्याने त्याचे नेमके स्पष्टीकरण अनिल परब ईडीकडून मागवतील, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :अनिल परबअंमलबजावणी संचालनालय