"संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करतात, की अजून कोणावर ते बघावं लागेल"
By मुकेश चव्हाण | Published: October 10, 2020 04:40 PM2020-10-10T16:40:54+5:302020-10-10T16:41:39+5:30
संभाजीराजेंच्या या विधानानंतर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाब्दिक वाद थांबवण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई/ नाशिक: मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहीत आहे. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, असं म्हणत गरज पडेल, त्यावेळी तलवारीही काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. संभाजीराजेंच्या या विधानानंतर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाब्दिक वाद थांबवण्याचे आवाहन केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, राजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. तसेच आता संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करतात का अजून कोणावर करतात ते बघावं लागेल, असं छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जातीला सोबत घेऊन लढाई लढली. महाराज हे सगळ्यांचे आहेत, असं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणं आवश्यक आहे. जेवढ्या परीक्षा पुढे ढकलू तेवढं वय निघून जाईल. ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना आपण का आडवत आहे. भरतीच्या आड कोणी यावं असं मला वाटत नाही, असं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी, १९०२ मध्ये शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिले. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे आवश्यक आहे. ८० टक्के मराठा समाज गरीब आहे. मात्र आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो आहोत. आम्हाला आता गृहीत धरु नका आणि कायदा हातात घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.
याशिवाय, आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राज्यात होणारी मराठा आंदोलने भाजपा पुरस्कृत नाहीत, असेही संभाजीराजे यांनी सांगितले होते.
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन तुळजापूर मध्ये आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालो.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 9, 2020
यावेळी ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.#एक_मराठा_लाख_मराठा. pic.twitter.com/uCSjZ17Ovt
मी कधीही तलवार काढू असे म्हटले नाही- संभाजीराजे
विजय वडेट्टीवार यांच्यामुळे मी फार दुःखी आहे. ओबीसी मधून आरक्षण नको हे मी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. विजय वडेट्टीवार मला म्हणाले होते की ओबीसी मधून आरक्षण देण्यास तयार आहे. मी म्हणालो कृपया असे करू नका. विजय वडेट्टीवार असं का वागत आहेत माहिती नाही, असं संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच मी कधीही तलवार काढू असे म्हटले नाही. सारथी विषयी आणि माझ्याविषयी विजय वडेट्टीवारांना आकस आहे. तोच पुन्हा बाहेर येतोय. महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सूरू आहे. त्यात सत्ताधारी पक्षातली काही मंडळी आहेत. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. विजय वडेट्टीवार मला एक बोलले आणि आता दुसरं बोलतायत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. त्यांनी असं करू नये, त्यांनी माझं संपूर्ण भाषण ऐकावं, असं संभाजीराजे यांनी म्हटले होते.