मुंबई: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत राज्य सरकारमधील मंत्री दादा भुसे यांच्यावर ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप भुसे यांच्यावर करण्यात आला आहे. कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेत. मात्र प्रत्यक्ष कंपनीच्या वेबसाइटवर कमी शेअर्स दाखवण्यात आले आहेत. ही थेट जनतेची लूट आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांच्या या ट्विटवर आज विधानसभेत निवेदन मांडत दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं. दादा भुसे म्हणाले की, आम्हाला नेहमी गद्दार म्हणणारे, मात्र आमच्याच मतांवर निवडून येणारे महागद्दार संजय राऊत यांनी काल एक माझ्याबद्दल ट्विट केलं. माझी आपल्याला विनंती आहे की, जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी जे ट्विट केलंय, त्याची चौकशी व्हावी. या प्रकरणात मी दोषी आढळल्यास मंत्रिपदाचा, आमदारकीचाच काय संपूर्ण राजकारणातून निवृत्त होईल. तसेच जर या प्रकरणात खोटं आढळून आल्यास त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. त्याचप्रमाणे दैनिक सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा देखील द्यावा, असं आव्हान दादा भुसे यांनी संजय राऊतांना दिलं आहे. तसेच संजय राऊतांनी जर माफी न मागितल्यास मालेगावचे शिवसैनिक त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील दादा भुसे यांनी दिला आहे.
दादा भुसे पुढे म्हणाले की, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीचे माननीय शरद पवार यांची करतात आणि हे आम्हाला शिकवतात. दादा भुसेंनी असं वक्तव्य करताच विरोधीपक्षातील आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 'दादा भुसे हाय हाय' अशा घोषणा देखील सभागृहात देण्यात आल्या. त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तात्काळ जागेवरुन उठत दादा भुसे यांना सुनावले. तुम्हाला काय मांडायचं आहे ते मांडा, मात्र तुम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख यांचं नाव घेण्याची गरज नाही. दादा भुसे यांनी सभागृहात जे काही म्हटलं आहे, ते रेकॉर्डवरुन काढून टाका, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष यांनी दादा भुसे यांनी केलेलं विधान आम्ही तपासून घेऊ आणि त्यात जे काही अनुचित असेल ते रेकॉर्डवरुन काढून टाकण्यात येईल, असं स्पष्टीकरण दिलं.
दरम्यान, संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्या गिरणा अॅग्रो कंपनीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल…विशेष म्हणजे ईडी आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील संजय राऊत यांनी टॅग केलं आहे.