टोलबाबत शासनाची भूमिका काय?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर दादा भुसेंनी स्पष्टच सांगितले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:50 AM2023-10-13T11:50:23+5:302023-10-13T11:54:24+5:30
अॅम्ब्युलन्स,स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय लोकांना ते कळेल, असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज सकाळी मुंबई आणि महाराष्ट्रातील टोलच्या मुद्द्यावर बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी बैठकीत झालेल्या विविध मुद्द्यांची माहिती दिली. यामध्ये प्रत्येक शहरात दर दिवसाला वाहनसंख्या वाढतेय. परंतु टोलवरून किती वाहने जातात याचा आकडा नाही. त्यामुळे सरकारने पुढील १५ दिवस सर्व एन्ट्री पाँईटवर कॅमेरा लागतील. त्यासोबत आमचेही कॅमेरा लागतील. त्यात वाहने किती जातायेत, हे नागरीक म्हणून आपल्याला कळेल. टोलनाक्यांवर व्हिडिओग्राफी केली जाईल, असं राज ठाकरेंनी सांगितले.
अॅम्ब्युलन्स,स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय लोकांना ते कळेल, असं राज ठाकरे म्हणाले. करारमधील नमूद उड्डाणपूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. आयआयटी मुंबईकडून हे ऑडिट करण्यात येईल. ५ रुपये वाढीव टोलबाबत १ महिन्याचा अवधी सरकारला हवा आहे. त्यानंतर वाढीव टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
आनंद नगर आणि ऐरोली प्रवास करणाऱ्या ठाणेकरांच्या वाहनांना एकदाच टोल भरावा लागेल. मुलुंडच्या हरिओम नगरमधील रहिवाशांसाठी तात्काल नाल्यावर पूल बांधला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे १५ टोलनाके बंद करण्याबाबत सरकारकडून १ महिन्यात निर्णय घेतला जाईल. टोलप्लाझा परिसरात राहणाऱ्या लोकांना सवलतीत मासिक पास उपलब्ध केले जातील अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.
राज्य सरकारची भूमिका काय?
मुंबई एन्ट्री पॉईंट्स टोल आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर समिती वेगळी नेमण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी जे मुद्दे ठेवले त्यावर आम्ही आजपासूनच कामाला लागलो. एन्ट्री पॉईंट्स आणि राज्यातील टोलबाबत सविस्तर चर्चा झाली. आम्ही काय सुविधा दिल्या त्याची माहिती दिल्याचं दादा भुसे यावेळी म्हणाले. तसेच टप्याटप्याने आम्हाला अंमलबजावणी करायची आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील याबाबत ,सकारात्मक आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.