उद्धव ठाकरेंच्या 'त्या' एका चुकीमुळे हजारो कोटींची गुंतवणूक गेली; दीपक केसरकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:34 PM2022-09-16T12:34:32+5:302022-09-16T12:35:41+5:30

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. 

Minister Deepak Kesarkar has alleged that investment worth thousands of crores was lost due to lack of time for former CM Uddhav Thackeray. | उद्धव ठाकरेंच्या 'त्या' एका चुकीमुळे हजारो कोटींची गुंतवणूक गेली; दीपक केसरकरांचा आरोप

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' एका चुकीमुळे हजारो कोटींची गुंतवणूक गेली; दीपक केसरकरांचा आरोप

googlenewsNext

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉर्न हा हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. मात्र याचदरम्यान शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हा हजारो कोटींची गुंतवणूक उद्धव ठाकरेंना वेळ न मिळाल्यानं गेली, असा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. दिल्लीवरुन मला निरोप आला होता की, उद्धव ठाकरेंसोबत राज्यात गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट करुन द्या. मात्र तेव्हा उद्धव ठाकरेंनी ती भेट केवळ वेळ नसल्यामुळे नाकारली. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे जे सचिव आहेत, त्यांचा मला फोन आला की, गुंतवणूक करणाऱ्यांना उद्योगमंत्र्यांना भेटायला सांगा. मात्र त्यांनी उद्योगमंत्र्यांची भेट नाकारली. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच भेटायचे होते. त्यामुळे राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक गमावली, असं दीपक केसरकरांनी सांगितलं.

दरम्यान, वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी मोदींनी या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असं आश्वासन दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.मात्र सध्यातरी वेदांता प्रकल्पावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारची चौफेर कोंडी केली असून, त्याला प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता या वादातून मुख्यमंत्री कसा मार्ग काढतात, हे पाठणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

आदित्य ठाकरेंकडून शिंदे सरकार लक्ष्य-

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळांना भेटी देत बसले पण त्यांनी राज्यात येणाऱ्या उद्योगांवर जरा लक्ष द्यायला हवं अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत. तसंच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर-

दुसरीकडे फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गुजरातला गेला याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असं शिंदे यांनी म्हटलं.

Web Title: Minister Deepak Kesarkar has alleged that investment worth thousands of crores was lost due to lack of time for former CM Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.