Join us

बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने मंत्री धनंजय मुंडे यांनी केले अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 6:35 AM

तरुणीच्या आरोपाने खळबळ; ओशिवरा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने मुंडे यांनी आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे सदर तरुणीचा दावा आहे. पोलीस आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचे ट्विटही तिने केले आहे. मात्र  त्यानंतर सोमवारी (दि. ११) रात्री ओशिवरा पोलिसांनी तरुणीचा तक्रार अर्ज स्वीकारून अधिक तपास सुरू केला आहे. 

एखाद्या चित्रपटाचे कथानक असावे अशी ही कहाणी असून स्वत: धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियात यावर सविस्तर खुलासा केल्याने उलट-सुलट चर्चा रंगली आहे. तक्रारदार तरुणी ही पार्श्वगायिका आहे. तिच्या तक्रारीनुसार, मुंडे यांच्याशी तिचा परिचय १९९७ मध्ये इंदूर (मध्य प्रदेश) येथील तिच्या बहिणीच्या घरी झाला. १९९८ मध्ये तिच्या बहिणीशी मुंडे यांचा प्रेमविवाह झाला. २००६ साली बहिण बाळंतपणासाठी इंदूरला गेली असता ती संधी साधून मुंडे यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे दर दोन ते तीन दिवसांनी तिच्यावर अत्याचार सुरू होते. याचे व्हिडीओही त्यांनी काढले. त्यानंतर वारंवार फोन करून प्रेमाची गळ घालण्यास सुरुवात केली. पुढे गायिका होण्यासाठी बड्या सेलिब्रिटी, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत भेट घालून बॉलीवूडमध्ये संधी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिने १० जानेवारी रोजी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांंना ऑनलाइन तक्रार दिली. मात्र तक्रारीची दखल घेतली गेली नाही म्हणून तिने मुंबई पोलीस आणि आयुक्तांंना ट्विट केले. तिच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ ट्विटची दखल घेत, जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यास सांगितले. सोमवारी रात्री ११ वाजता तरुणीचा तक्रार अर्ज पोलिसांनी स्वीकारला. तिचा तक्रार अर्ज स्वीकारल्याच्या वृत्ताला ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दुजोरा दिला.

तरुणीच्या जिवाला धोका!तरुणीने जीवाला धोका असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनाही हे ट्विट करून मदत मागितली आहे.

मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर थेट बलात्काराचा आरोप झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार. मुंडे यांची ते हकालपट्टी करतात की, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तोपर्यंत थांबतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

इतकी वर्षे संबंध का लपविले?मुंडे यांनी, आपण २००३ सालापासून तक्रारदार तरुणीच्या बहिणीसोबत परस्पर सहमतीने संबंधात होतो. या संबंधामधून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली, अशी कबुली दिली आहे. मात्र, मुंडे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन मुलांचा उल्लेख केलेला नाही. प्रतिज्ञापत्रात फक्त लग्नाची पत्नी आणि तीन अपत्यांचा उल्लेख आहे. मुंडेंनी इतके वर्ष संबंध का लपून ठेवले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीचे काय?n धनंजय मुंडे १९९५ सालापासून राजकारणात आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले, मात्र २०१० साली त्यांची साथ सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. n २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषदेवर वर्णी लागली. ते विरोधी पक्षनेते झाले. n २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यांनी चुलत भगिनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. या आरोपामुळे मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंध सहमतीने, आरोप ब्लॅकमेल करण्यासाठी; मुंडे यांचे स्पष्टीकरण

तक्रारदार तरुणीने केलेले सर्व आरोप खोटे, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे असल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.  याबाबत फेसबुकवर मुंडे यांनी सविस्तर खुलासा केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारकर्तीच्या बहिणीसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. तक्रारकर्तीच्या बहिणीला मी मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. तसेच त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. मात्र २०१९   पासून या दोघी बहिणी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करत आहेत. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ देखील सहभागी होता.या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे.

या संदर्भात मी स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच सदर तरुणीने माझ्याकडे तिच्या मोबाईल वरून मला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे एमएमएस रुपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये तिच्या बहिणीच्या सोयीने प्रकरण सेटल करावे यासाठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो, असे मुंडे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :धनंजय मुंडेबलात्कारगुन्हेगारीमुंबई