मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी दाखल असलेल्या चार्जशीटमधून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. धनंजय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. धनंजय मुंडे यांची लिव इन पार्टनर करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा ही त्यासाठी कारणीभूत होती. रेणू मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आरोपात अडकवण्याची धमकी दिली होती. सातत्याने धनंजय मुंडे यांच्याकडून वसुली सुरू होती त्यामुळे ते खूप त्रस्त झाले होते.
रेणू शर्माविरोधात शनिवारी बळजबरीनं वसुली करण्याच्या आरोपाची चार्जशीट दाखल करण्यात आली होती. क्राइम ब्रांचनं रेणू शर्मा यांनी २० एप्रिलला इंदूरहून ५ कोटीची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. रेणूकडे कमाईचं कुठलंही दुसरं साधन नाही. परंतु तिच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात व्यवहाराची नोंद झाली आहे. २०१७ मध्ये ओशिवारा येथे एका बँकेत रक्कम जमा झाली होती. तर फेब्रुवारीला केवळ त्यांच्या खात्यात ६ हजार ६५२ रुपये होते असं पोलिसांनी सांगितले.
वसुलीच्या पैशाने ५४ लाखांचं डुप्लेक्स खरेदीपोलिसांनी या प्रकरणी इंदूर-स्थित एका विकासकाचा जबाबही नोंदवला, ज्याने सांगितले की, रेणूने फेब्रुवारीमध्ये नेपेनिया रोड, इंदूरवरील बीसीएम पार्कमध्ये सुमारे ५४.२ लाख रुपयांना डुप्लेक्स खरेदी केले होते. ड्युप्लेक्स वसुलीच्या पैशाने खरेदी केल्याचा दावा करत पोलिसांनी कागदपत्रे जप्त केली. यापूर्वी मुंडे यांनी हवालाद्वारे रेणूला ५० लाख आणि आयफोन दिल्याचे सांगितले होते. त्याचवेळी दोन हवाला ऑपरेटर्सनी मुंडेच्या वतीने रेणूला इंदूरमध्ये पैसे दिल्याचे सांगितले.
सततच्या छळामुळे मुंडे नैराश्यात सततच्या छळामुळे आणि खंडणीच्या मागणीमुळे मुंडे नैराश्यात गेल्याचे पोलिस आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. १२ ते १६ एप्रिलपर्यंत ते रुग्णालयात होते. यावेळी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला, त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची कागदपत्रे आणि त्यांचा वैद्यकीय अहवाल जोडला आहे.
मुंडे यांना बलात्काराच्या आरोपाखाली गोवण्याचा प्रयत्नआरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, रेणूने ओशिवरा पोलिसांत खोटी तक्रार दाखल करून मुंडे यांना बलात्कार प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला होता. करुणा आणि मुंडे यांच्यात सुरू असलेल्या न्यायालयीन वादात मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणूने हा आरोप केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, ते म्हणाले की, गेल्या फेब्रुवारीमध्ये रेणू यांनी मुंडे यांना पुन्हा धमकी दिली होती की, जर तुम्ही पैसे, दुकान आणि आयफोन दिला नाही तर ती पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यात पक्षाचे इतर वरिष्ठ नेते, मित्र आणि नातेवाईक तेदेखील यात अडकतील असा प्रयत्न करणार होती.