"सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 11:35 AM2021-07-04T11:35:44+5:302021-07-04T11:40:02+5:30

संभाजीराजे यांच्या विधानावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Minister Dhananjay Munde has reacted to Chhatrapati Sambhaji Raje's statement. | "सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये"

"सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये"

googlenewsNext

मुंबई: जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवारी खासदार छत्रपती संभाजीराजे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीड शहरातील जनसंवाद कार्यक्रमाला संबोधन झाल्यानंतर संभाजीराजे यांनी उपस्थितांना काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा असे सांगितले होते. त्यानंतर ओबीसी समाजातून आरक्षण का नको? असा प्रश्न एका तरूणाने विचारला. संभाजीराजे यांनी त्या तरुणाला हीच मागणी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची असल्याचं सांगितलं. 

तरुणाच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे म्हणाले की, "जो प्रश्न तुम्ही मला विचारताय, तोच प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. हा प्रश्न तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा विचारला पाहिजे. पण तुम्ही तिथे विचारत नाही. मला विचारायचा असेल तर मला मुख्यमंत्री करा." असे यावेळी संभाजीराजे म्हणाले. मात्र हे वाक्य संपत असतानाच मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे, अशी भूमिकासुद्धा यावेळी संभाजीराजे यांनी बोलून दाखवली. 

संभाजीराजे यांच्या या विधानावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळं मनातील प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार सक्षमपणे कोर्टात मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी ताकतीने लढणार आहे. त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार उगीच वायफळ चर्चेला अर्थ नाही, असा टोला देखील धनंजय मुंडेंनी विरोधकांना लगावला आहे. ते परळी येथे परळी बायपास रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

आता केंद्राची जबाबदारी-

संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणासंबंधी राज्याची भूमिका संपली असून आता केंद्र सरकारला आता लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी लागेल. मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही ते आता केंद्र सरकारने ठरवावं. राज्य फक्त आता शिफारस करु शकेल. त्यामुळे आता केंद्राची जबाबदारी आहे.

छत्रपती घराण्याचा वारस आहे, मॅनेज होणार नाही-

कोल्हापूर येथील मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच मी सरकारशी संवाद साधला. याचा अर्थ मी मॅनेज झालो, असे काढणे चुकीचे आहे. छत्रपती घराण्याचा वारस असल्याने मी मॅनेज होणार नाही, असे प्रतिपादन संभाजीराजे यांनी रविवारी केले होते.

ओबीसीतून आरक्षण द्या, असे म्हणणार नाही-

संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी समानतेचा विचार मांडला. त्यांचा वारसदार म्हणून मी ओबीसीचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी भूमिका घेणार नाही. जे जे वंचित आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी माझी भूमिका कायम राहणार आहे. ते कसे द्यायचे ते सत्ताधाऱ्यांनी ठरवायचे आहे असंही संभाजीराजे म्हणाले होते.

Web Title: Minister Dhananjay Munde has reacted to Chhatrapati Sambhaji Raje's statement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.