Join us

"हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाही, लवकर राजीनामा द्या अन्यथा..."; भाजपाचा धनंजय मुंडेंना इशारा

By मुकेश चव्हाण | Published: January 13, 2021 9:17 AM

मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे. 

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे, असं उमा खापरे यांनी सांगितले. तसेच वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे. 

तत्पूर्वी, धनंजय मुंडे  यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी लोकमतला सांगितले. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत तिने ही माहिती दिली आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे.

२००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत मदतीची साद घातली आहे. 

माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे- धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत याबाबत खुलासा करताना म्हटले की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत)  स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही  तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केले आहे. 

धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही- किरीट सोमय्या

३ महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे याबाबतचा व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी ट्वीट केला आहे. तसेच त्या व्हिडीओमधून किरीट यांनी मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडून जे आरोप होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृतीला धक्का पोहचला असून जोपर्यंत धनंजय मुंडे यांची आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :धनंजय मुंडेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडी