मुंबई - सोशल मीडिया अकाऊंट हँक होणं हा नवीन प्रकार राहिला नाही, पण चक्क मंत्रीमहोदयांचं फेसबुक पेजच हॅक करण्यात आलं आहे. त्यामुळे, सोशल मीडियातील या हॅकर्संना आळा घालण्यासाठी आता सायबर विभागाने मोहीम आखणे गरजेचं असल्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आल होते. त्यानंतर, आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच फेसबुक पेज हॅक करण्यात आलंय.
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन माहिती देताना आपलं फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली. तसेच, मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन किंवा मॉडेरेटर म्हणून कुठलिही एक्टीव्हीटी करू शकत नाही. तरी, फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देऊन पेज सुरू करावे, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सायबर विभागाकडे आपण रीतसर तक्रारही नोंदवल्याचे त्यांनी सांगितलंय.