Eknath Shinde: एकनाथ शिंदे आज परिपत्रक काढणार; पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता, राज्याचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 10:41 AM2022-06-27T10:41:09+5:302022-06-27T10:42:07+5:30
एकनाथ शिंदे गटात जवळपास ४२ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना अल्पमतात आहे.
मुंबई- राज्यात महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाकडून शिवसेनेला इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार आज फुटलेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचं पाऊल उचललं गेलं आहे.
एकनाथ शिंदे गटात जवळपास शिवसेनेचे ३९ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना अल्पमतात आहे. तरीही शिंदे गटाविरोधात अपात्रतेची कारवाईची मागणी केली जात असल्यानं शिंदे गटानं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्याचवेळी शिंदे गटाकडून 'प्लान-बी'ची देखील आखणी सुरू असल्याचं बोललं जात आहे. तसेच आज एकनाश शिंदे गटाकडून परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिपत्रकामधून बंडखोर आमदारांची पुढील भूमिका नेमकी काय असणार, हे स्पष्ट करण्यात येणार आहे.
शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
शिंदे गटाची भूमिका महाराष्ट्रातील जनतेला पटणार नाही. शिवसेनेनं हिंदुत्वाची प्रतारणा केली असं एक उदाहरण फक्त दाखवा. सत्य परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या आणि तुमच्या डोळ्यासमोरच्या खिडक्या उघडा, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी बंडखोर आमदार मनसे काय ते एमआयएम, समाजवादी आणि इतर पक्षातही विलीन होऊ शकतात असं म्हटलं. आमदारकी वाचवण्यासाठी ते कोणत्याही पक्षात विलीन होऊ शकतात. अनेक पर्याय त्यांच्यासमोर आहेत, असंही राऊत म्हणाले.
शिंदे गटाला १६, भाजपच्या वाट्याला २६ मंत्रिपदे शक्य?
भाजप आणि शिंदे गटात मंत्रिमंडळ रचनेबाबत तीन फेऱ्यांची चर्चा आतापर्यंत झाली आहे. सरकार स्थापन करण्यातील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करून मंत्रिमंडळाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने बंडासाठी ज्या हालचाली गेले दोन-अडीच महिने सुरू होत्या, त्या हालचालींमध्ये शिवसेनेच्या ज्या दोन आमदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली त्या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची कमाल सदस्यसंख्या ४२ इतकी असते. शिंदे गटाला १६ मंत्रिपदे दिली तर भाजपच्या वाट्याला २६ मंत्रिपदे येऊ शकतील. दोन्ही बाजूंचे काही समर्थक अपक्ष आमदार आहेत त्यांचे समाधान आपापल्या पातळीवर करावे, असा निर्णय होऊ शकतो.