मुंबई- राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची घडामोड समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आमच्या आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते संजय राऊत जबाबदार असतील असंही एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या या ट्विटबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता, त्यांनी ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, असं रोखठोक मत व्यक्त केलं. बंडखोरी करुन राज्यातून पळून गेलेल्या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. आमदारांना सुरक्षा असते त्यांच्या कुटुंबीयांना नसते आणि हे तर राज्यातून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होणार असून या बैठकीत बंडखोरांविरोधात मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टीचा निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो. तसंच पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. दुपारी १ वाजता बैठक होणार आहे.
तब्बल १० तासांनंतर फडणवीस मुंबईत-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते. त्यानंतर १० तासानंतर ते पुन्हा मुंबईत परतले आहेत. भाजपाच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. फडणवीस नेमके कुणाला भेटले याची चर्चा आता सुरू झाली आहे.