Join us

शिवसैनिक जागा झाला; बाळासाहेबांच्या विचारांची लढाई आज एकनाथ शिंदेंनी जिंकली- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:36 PM

राज्यात घडलेल्या या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपाचे नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. 

मुंबई- विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याला अवघे काही तास उरले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आघाडी सरकार कोसळले असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासोबत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नवे उपमुख्यमंत्री असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

देवेंद्र फडणवीस हे आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना गुरुवारी देतील आणि शुक्रवारी (दि.१) फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात घडलेल्या या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपाचे नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. 

उद्धव ठाकरेंच्या राजीनामानंतर राज्यात एक नवीन पर्व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरु होणार आहे. विकास कामांच्या मार्गावर चालणार महाराष्ट्र, हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ५० वर्षे मागे गेला होता, तो आता निश्चितपणे घोडदौड सुरु करेल, असा विश्वास भाजपाचे नेते नितेश राणे यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदेंचा हा बंड नव्हता. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या कुशीत वाढलेले एक कडवट शिवसैनिक आहेत, असं राणे म्हणाले.

ज्या शिवसेनेला नारायण राणे, राज ठाकरे, आनंद दिघे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी उभं केलं, त्या शिवसेनेला तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमार्फत संपवण्याचा प्रयत्न करत असाल, बाळासाहेबांच्या विचारालाच आव्हान देत असाल, मग जो त्यांनी घडवलेला शिवसैनिक आहे, तो जागा होणाराच, असं नितेश राणे म्हणाले. आज एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवली. त्यांनी काही बंड केलं नाही. बाळासाहेबांच्या विचारांची लढाई आज एकनाथ शिंदेंनी जिंकलेली आहे, असं नितेश राणे यांनी सांगितलं. 

दरम्यान, ज्यांना सरकार पाडून दाखवण्याचं कंत्राट मिळालं होतं. त्यांनी ते पाडून दाखवलं. आता त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. तसंच ठाकरे परिवाराला सत्तेची लालसी कधीच नव्हती. पवारांनी विनंती केली म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आज जे विरोधात बोलत आहेत त्यांच्यापैकी अनेकांचं पालन पोषण शरद पवारांच्या नेतृत्त्वात झालं, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

सरकार २५ वर्षे टिकेल- देवेंद्र फडणवीस

काल दिवसभरात घडलेल्या अनेक घडामोडी आणि कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर रात्री सुप्रिम कोर्टाने बहुमत चाचणी नियोजित वेळेनुसार घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करत उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पराभव झाला म्हणून आपण उन्माद करायचा नाही, असा सल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले की, अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल. या संपूर्ण लढाईत भाजपाच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची होती. तसेच या संपूर्ण घटनाक्रमात निर्णायक भूमिका घेणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचेही मी आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेनीतेश राणे भाजपा