'मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्रीपद कोळी समाजाला द्यावं'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 01:33 PM2019-10-28T13:33:01+5:302019-10-28T13:35:24+5:30
कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांची मागणी
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: राज्यातील महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कोळी समाजाला प्रतिनिधित्व देऊन मत्स्यव्यवसाय खाते कोळी समाजाच्या लोकप्रतिनिधीला मिळावे अशी आग्रही मागणी विविध संघटनांची शिखर संघटना असलेल्या कोळी महासंघाकडून आता जोर धरू लागली आहे.
राज्यातील 720 किलोमीटर पसरलेल्या सागरी किनाऱ्यावर कोळी समाज मोठ्या संख्येने असून तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. मासेमारी आणि त्यावर उपजीविका करणाऱ्या लाखो समाज बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी कोळी समाजाचा मंत्री हवा अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी केली आहे. कोळी महासंघाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
महाराष्ट्रात कोळी समाज मोठ्या संख्येने असून त्या समाजाला एकवटण्याचे काम कोळी महासंघाचे अध्यक्ष व भाजपाचे विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनी केले आहे. आपल्या निरनिराळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रतीक्षेत कोळी महासंघ आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि मित्रपक्षांना एप्रिलमधील झालेल्या लोकसभा व नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत सक्रीय पाठिंबा दिला आहे. तर कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाने 2014च्या विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि मित्र पक्षांना भरभरून मतदान केले आहे.
महाराष्ट्रातील 55 मतदारसंघात कोळी समाजाची लोकसंख्या निर्णायक असून त्यावेळीदेखील त्यांनी भाजप महायुतीला मतदान करून सर्व जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून देण्याची कामगिरी कोळी महासंघाने पार पाडली आहे. या विधानसभा निवडणुकीतही कोळी महासंघाने भाजप आणि मित्र पक्षांना सक्रीय पाठिंबा दिला होता. विधानसभेच्या 55 मतदारसंघांपैकी 49 विधानसभा मतदारसंघात कोळी समाजानं महायुतीचे उमेदवार विजयी केले आहेत. त्यामुळे आपले प्रश्न निकाली निघावेत म्हणून कोळी समाज आशावादी राहिला असल्याचे कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी यांनी सांगितले.
मासेमारीवर आलेले दुष्काळाचे सावट, मागील वर्षभर मच्छिमारांची झालेली कुचंबणा, डिझेलवरील परतावा आणि मासेमारांच्या कोणत्याही सुविधा मच्छिमारांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. यावर्षीही एक ऑगस्टला मासेमारी हंगाम सुरू झाल्यापासून नैसर्गिक आपत्ती मासेमारांवर ओढवली आहे. वादळी हवामान, अवेळी पावसामुळे आजपर्यंत मासेमारी होऊ शकली नाही. त्याच बरोबर गावठाणांचे प्रश्न, कोळीवाड्यांचे अस्तित्व, मूलभूत सुविधा, जातीचे दाखले अशा निरनिराळ्या प्रश्नांवर आजही कोळी समाज उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे दुर्लक्षित असलेल्या कोळी समाजाला न्याय मिळण्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्रीपद हे कोळी समाजालाच दिले पाहिजे अशी जोरदार मागणी टपके यांनी केली आहे
केंद्राने सुरू केलेले मत्स्य व्यवसायाचे वेगळे मंत्रालय, नव्याने येऊ घातलेले मत्स्य धोरण , मच्छिमारांवर आलेली नैसर्गिक आपत्ती, खोल समुद्रातील मासेमारी, मच्छिमारांमध्ये उद्भवणारे तंटे, समस्या सोडविण्यासोबतच मासेमारीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्र असलेल्या या समाजाला राजकीय प्रवाहात आणण्याबरोबर सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मत्स्य व्यवसायाचे मंत्रीपद हे कोळी समाजालाच दिले पाहिजे. कोळी महासंघाचे अध्यक्ष व आमदार रमेश पाटील यांना मंत्रीपद द्यावे अशी आग्रही मागणी कोळी समाजाच्या वतीने राजहंस टपके यांनी केली आहे.