मुंबई - नामर्दांना जिथं स्थान नाही, ती आमची शिवसेना. आमच्यावर बाप पळवल्याचा आरोप केला जातोय. ३५ वर्ष आम्ही बाळासाहेबांजवळ राहिलो, बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेऊन ज्यांच्याविरोधात आयुष्य खर्ची घातले त्यांच्यासोबत या लोकांनी युती केली. आमचा दोष काय? आम्ही शिवसेना सोडली नाही, पक्षांतर केले नाही. आम्ही फक्त बाळासाहेबांचे विचार कायमस्वरुपी जिवंत राहावी यासाठी हा उठाव केला आहे अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंवर घणाघात केला.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यावर आरोप करणारे, आमच्या मतावर मोठे झालेले आमच्यावर आरोप करतायेत. घोडा मैदान दूर नाही. या सरकारने सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले. वर्षभरात आम्ही काय केले नाही हे सांगण्याची धमक त्यांच्यात नाही. ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेत असा आरोप त्यांनी केला.
तसेच मी ग्रामीण खेड्याचा पोट्टा आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांनी आमच्यासारख्यांना मोठे केले. आज आपल्याला संघटन बांधण्याची गरज आहे. ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. १ लाख कार्यकर्ते जिल्ह्यात घडवायचे ही शपथ घ्यायची आहे. विरोधकांना हरवायचे असेल तर बोलून नाही ताकद वाढवून दाखवायची असते. एकनाथ शिंदे यांनी काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आणि आम्ही गाव सांभाळतो असा शब्द मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.